
मुंबईला वृक्षनगरीचा दर्जा मिळवून देणारी आणि मुंबईच्या विकासासाठी कोस्टल रोडपासून शिवडी-न्हावा-शिवापर्यंत अनेक प्रकल्प राबवले जात असताना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करून जैवविविधता जपणारी मुंबई महापालिका आता मेट्रोच्या सौंदर्यात भर टाकत आहे. महापालिकेने अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील अंधेरी-वर्सोवा मार्गात विविध शोभिवंत फुलांचा मळा फुलवून मेट्रोचे सौंदर्य वाढवले आहे.
मुंबईत पहिल्यांदा सुरू झालेल्या अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांना मोठी सुविधा मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवरील प्रवाशांचा वेळ वाचला आहेच, त्याचबरोबर दोन्ही रेल्वेवरील प्रवाशांचा वाढता ताणही कमी झाला आहे. मुंबईकरांना मोठा दिलासा देणाऱ्या या मार्गावर मात्र काही स्थानके ही स्थानिक रहिवाशांच्या निष्काळजीपणामुळे अस्वच्छ झाली आहेत. मेट्रोच्या पुलाखाली असलेल्या रिकाम्या जागेत कचरा टाकला जात असल्यामुळे पुलाखालील परिसराला अवकळा आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने अंधेरी-वर्सोवा मेट्रोच्या पुलाखाली लीली, ड्रेसिना, कॅलॅडियम ही शोभिवंत झाडे लावून या परिसराचे सौंदर्य वाढवले आहे. के-पश्चिम विभागाचे साहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
उद्यान विभागाची सौंदर्यदृष्टी
अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत असली तरी पुलाखाली कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक होते. पुलाखाली कचरा टाकल्याने हा परिसर अस्वच्छ आणि बकाल होत होता. त्यामुळे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी पुलाखाली उद्यान साकारण्याची संकल्पना मांडली. मेट्रो रेल्वे प्रशासन पुलाखाली देखभाल करत असल्याने उद्यान विकसित करण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी मागितली. ऑक्टोबर 2021 मध्ये उद्यान साकारण्यास परवानगी दिली आणि त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाने शोभिवंत झाडे लावून अंधेरी-वर्सोवा मार्गाखालील 5,700 चौरस मीटर व 2.10 किलोमीटर लांबीच्या या परिसरात उद्यानाच्या रूपाने सौंदर्य फुलवले. मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांचे या कामी मोलाचे मार्गदर्शन लाभले.




























































