
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प 52 हजार 619 कोटींचा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 6,770 कोटींनी वाढला आहे. यात मुंबईतील विकासकामांसाठी 27 हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात महसूल वाढवणे, महसूल वाढीसाठी नवीन स्रोतांचा शोध घेणे, खर्चावर नियंत्रण यावर भर देण्यात आला आहे. पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी यात 3,545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बेस्ट उपक्रमाला 800 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे.






























































