सहा महिन्यात महानगरपालिकेने बुजवले 31 हजार 398 खड्डे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिनांक 9 एप्रिल 2021 ते दिनांक 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील एकूण 31 हजार 398 खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 1 लाख 56 हजार 910 चौरस मीटर इतके होते. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते, ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह 6 मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने अवलंबले असून त्याची कार्यवाही सुरु झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे कार्य महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात येते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो.

रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी 2 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित 50 लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत.

याशिवाय, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीत असलेले रस्ते हे संबंधित नियुक्त कंत्राटदाराकडून निविदेतील अटी व शर्तींनुसार मर्यादीत वेळेत तसेच विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला/अधिदान दिले जात नाहीत .

या अनुषंगाने यंदाचा विचार करता, महानगरपालिकेतर्फे दिनांक 9 एप्रिल 2021 ते दिनांक 8 सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. त्यात महानगरपालिकेच्या धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) मार्फत 24 प्रशासकीय विभाग कार्यालयांना मिळून एकूण 2 हजार 696 मेट्रिक टन (1 लाख 07 हजार 843 बॅग) वितरित करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत विभाग कार्यालयातील उपलब्ध महानगरपालिकेच्या नियमित कामगारामार्फत 22 हजार 897 खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ 49 हजार919 चौरस मीटर आहे.

तसेच, खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून २४ प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत 8 हजार 501 खड्डे बुजविण्यात आले आहेत. या बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ 1 लाख 06 हजार 985 चौरस मीटर आहे .
तसेच, प्रकल्प रस्ते व दोष दायित्व कालावधीतील रस्त्यांवर संबंधित नियुक्त कंत्राटदारांकडून खड्डे भरुन घेण्याची कार्यवाही विनामूल्य करुन घेण्यात आलेली आहे.

डांबराचे रस्ते (अस्फाल्ट रोड) मध्ये असलेल्या बिटुमनच्या गुणधर्मानुसार पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कामुळे खड्डे पडणे ही नित्य प्रक्रिया आहे. ही बाब लक्षात घेता, खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी, यापुढे 6 मीटर रुंदीचे रस्तेसुद्धा टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिकेने स्वीकारले आहे. त्यामुळे भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे.