
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई महापालिकेमार्फत देवनार येथील डंपिंग ग्राऊंडमधून कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ लागणार असून त्यासाठी ऑक्टोबर 2022 पर्यंतची मुदतवाढ द्या अशी विनंती करणारा अर्ज महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
मुंबईतील कचऱ्याच्या समस्येवरून हायकोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश संकलेचा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यावेळी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याच्या पद्धतीमुळे दररोज कचरा जमा होण्याचे प्रमाण या वर्षी कमी आहे, असे पालिकेने कोर्टाला सांगितले. मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आले असून देवनार डंपिंग ग्राऊंडमधल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याबाबत निविदा मागविण्यात आल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली, परंतु या निविदांना अद्याप योग्य तो प्रतिसाद मिळालेला नसल्याचे पालिकेच्या वकिलांनी सांगितले.
हा प्रकल्प मोठय़ा क्षमतेचा असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निविदा मागविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यापूर्वी पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर उभारावे लागेल. त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.





























































