
दादर येथील ऐतिहासिक चैत्यभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे. पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणाचे सुशोभीकरण, दुरुस्ती आणि विकास केला जाणार आहे. या कामासाठी 29 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी राज्य शासनाकडून 2002 ते 2014 या कालावधीत 21 कोटींचा निधी आला आहे. या निधीच्या व्याजामुळे ही रक्कम 29 कोटींवर पोहोचली आहे. या निधीच्या माध्यमातून चैत्यभूमीची दुरुस्ती-सुशोभीकरण करणे आवश्यक होते. मात्र हे काम मार्गी लागत नव्हते.
या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीच्या विकासाचे काम तातडीने सुरू करावे असे निर्देशही जाधव यांनी आज पालिका प्रशासनाला दिले.
दरम्यान, 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर होणाऱ्य़ा कार्यक्रमासाठी साडेचार कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास त्यात वाढ करण्यात येईल असेही जाधव म्हणाले. दरम्यान, भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी ठरावाची सूचना मांडून पालिकेनेच चैत्यभूमीची डागडुजी व सुशोभीकरण करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. या बाबतचा ठरावही मंजूर करून पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
भाजपचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न
चैत्यभूमीच्या विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. असे असताना भाजपकडून आपल्यामुळेच विकास होत असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र चैत्यभूमीचा विकास राज्य सरकारकडून आलेल्या निधीतून होत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. भाजपची ही भूमिका म्हणजे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा आरोपही यशवंत जाधव यांनी केला.





























































