
महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्याने झालेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी ‘मिंधे’ सरकारने पालिकेचे तब्बल दहा कोटी रुपये उडवल्याचे समोर आले आहे. यासाठी ‘बीकेसी’ येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची संपूर्ण व्यवस्था पालिकेला करण्याचे निर्देश देण्यात आले होते. विकासकामांची जाहिरात करणे, सुमारे एक लाख लोकांच्या बसण्याची शक्यता व्यवस्था, ऑनलाइन भूमिपूजन, लोकार्पपणाची व्यवस्था अशी कामे पालिकेने केली.
‘स्वच्छ-सुंदर-सुरक्षित’ मुंबईसाठी सौंदर्यीकरणाची कामे, समुद्रात जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सिवरेज ट्रीटमेंट प्लाण्ट, सिमेंटचे मजबूत रस्ते, वेगवान प्रवासासाठी ‘कोस्टल रोड’, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य पेंद्रासह अनेक कामे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागली असताना ‘मिंधे’ सरकारने याचे श्रेय लाटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यातील अनेक कामांचे भूमिपूजन करण्याचा घाट घातला. यासाठी 19 जानेवारी रोजी ‘बीकेसी’ येथे भव्य सभेचे आयोजनही करण्यात आले. या ठिकाणची सर्व व्यवस्था पालिकेने केली होती. महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीआधी शिवसेनेने जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी ही कामे करण्याचे वचन दिले होते. यातील अनेक विकासकामे-प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यामुळे ‘मिंधे’ सरकारच्या श्रेय लाटण्याच्या भूमिकेचा मुंबईकरांमधून जोरदार निषेध करण्यात येत आहे.
अशी आहेत कामे आणि होणारा खर्च
- समुद्रात जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी सात सिवरेज ट्रीटमेंट प्लाण्ट सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये भांडुप प्रकल्प – 2537 हजार कोटी, वरळी – 5811, वर्सोवा – 1604, वांद्रे – 4293, मालाड 7107, धारावीसाठी – 4636 हजार कोटी असा एकूण 25 हजार 988 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
- सिमेंट-काँक्रीटच्या 400 किमींच्या रस्त्यांसाठी सहा हजार कोटी, भांडुप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 670 कोटी, सौंदर्यीकरणांच्या कामांसाठी एकूण 1750 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर कोस्टल रोडसाठी 12 हजार कोटींचा खर्च होणार आहे.
- शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रांसाठी’ 200 कोटींची तरतूद करण्यात आली. यानुसार सद्यस्थितीत 82 केंद्रे सुरू असून ही संख्या 200 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते यातील 20 आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले.



























































