सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या २ हजार ७०० सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांच्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमुळे सेवेत सामावून घेण्यास अडचणी येत आहेत त्या कामगारांकडून इंडेमिटी बॉण्ड (क्षतिपूर्ती बंधपत्र) घेऊन त्यांना येत्या तीन महिन्यांत सेवेत सामावून घ्यावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मुंबई महानगरपालिकेतील २ हजार ७०० सफाई कामगारांना सेवेत घेण्यासाठी येणाऱया अडचणीसंदर्भात आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे. न्यायालयाच्या यादीतील नावे व सफाई कर्मचाऱयांच्या पडताळणीत आढळलेल्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमधील चुकासंदर्भात संबंधित कर्मचाऱयांकडून इंडेमिटी बॉण्ड घेण्यात यावे. तसेच ज्या कामगारांना पूर्वी नियुक्ती देऊन स्पेलिंगमधील चुकांमुळे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहेत अशा कामगारांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी.
यावेळी आमदार भाई गिरकर, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल आदी उपस्थित होते. कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी यासंबंधी माहिती दिली व हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली होती.





























































