
मुंबई महापालिकेने नवउद्योजकांच्या (स्टार्टअप) नावीन्यपूर्ण व्यवसायांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी बनवलेल्या वस्तू, उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर महापालिकेच्या विविध विभागांमध्ये केला जाणार आहे. पालिकेने ‘सोसायटी फॉर मुंबई इनक्युबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप’ (स्माईल) कौन्सिल बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे नवउद्योजकांना उद्योगवाढीसाठी (स्टार्टअप) प्रोत्साहन मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात आयआयटी मुंबईअंतर्गत साईन बिझनेस इनक्युबेशन सेंटरकडून पाच नवउद्योजक निवडले आहेत.
हेस्टॅक ऍनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेड
हे स्टार्टअप संसर्गजन्य रोगांसाठी गुणसूत्रीय (जीनोमिक) विश्लेषणावर काम करत आहे. त्यामुळे आरोग्य सेवांचे निर्णय अधिक चोखपणे घेता येणार आहेत. सध्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील आण्विक प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या विविध प्रकारांचे निदान करण्यासाठी जीनोमिक सिक्वेन्सिंगचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरू झाला आहे. परिणामी, कोविड विषाणूचे वेगवेगळे व अद्ययावत प्रकार तत्काळ ओळखणे शक्य होते. पालिकेच्या आरोग्य विभागात क्षयरोग निदानासाठी असा प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे.
अयाती डिव्हाईसेस प्रायव्हेट लिमिटेड
या स्टार्टअपने एक नवीन न्यूरोथेरपी क्रीनर उपकरण विकसित केले आहे, जे ‘मधुमेहपूर्व’ टप्प्यात मधुमेहाच्या रुग्णांची लवकर तपासणी करण्यात मदत करते, जेणेकरून मधुमेही रुग्णांच्या संदर्भात पाय कापण्याची वेळ येणार नाही. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये या उपकरणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य मधुमेही रुग्णांसाठी जलद व प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करण्यास आरोग्य विभागाला मदत होणार आहे.
आयु डिव्हाईसेस प्रायव्हेट लिमिटेड
आयु डिव्हाईसेस यांनी ‘ब्लूटूथ सक्षम स्टेथोस्कोप’ हे नावीन्यपूर्ण उपकरण तयार केले आहे. डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करण्यासाठी शरीरावर स्टेथोस्कोप ठेवण्यास आणि संसर्गजन्य रोगांच्या बाबतीत सुरक्षित अंतर राखण्यास याची मदत होणार आहे. ब्लूटूथ हेडफोनद्वारे डॉक्टरांना निरीक्षण ऐकण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे उपकरण स्वयंचलितपणे प्रत्येक रुग्णाची माहिती मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे नोंदवते.
बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड
या स्टार्टअपने प्रगत कृत्रिम हात तयार केलेला आहे, जे इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक नैसर्गिक आणि मुक्त हालचाल करण्यास मदत करतात. हा हात प्रायोगिक चाचणीसाठी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदवलेल्या रुग्ण आवश्यकतेनुसार उपलब्ध व्हावा म्हणून स्माईल कौन्सिल व्यवस्था करीत आहे.
इमर्जी एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेड
मुंबईसाठी घनकचरा व्यवस्थापन (जैविक कचरा तसेच कचऱयापासून ऊर्जा निर्मिती), पाणी आणि सांडपाणी या विषयांमध्ये व्यवस्थापन करण्यासाठी हा नवउद्योजक काम करणार आहे.



























































