मुंबईतील 16 पुलांची तातडीने दुरुस्ती होणार, पालिकेच्या अभियंत्यांनी केली स्वतः तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहरातील 16 पुलांची दुरुस्ती आता लवकरच सुरू होणार आहे. याआधी डी. डी. देसाईने स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या या पुलांची तपासणी पालिकेच्या अभियंत्यांनी स्वतः केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिल्यानंतर स्थायी समितीत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

अंधेरीचा गोखले पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्क उड्डाणपूल, पादचारी पूल, भुयारी मार्ग अशा 296 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मुंबई शहरातील 73 पुलांची तपासणी देसाई असोसिएटस यांनी केली होती. यामध्ये 16 पुलांच्या दुरुस्ती ऑडिटरने सुचवली होती, मात्र ही दुरुस्ती ‘हिमालय’ पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या देसाई ऑडिटरच्या सल्ल्यानुसारच केली जाणार असल्यामुळे सर्वपक्षीयांनी यावर जोरदार आक्षेप घेत मागच्या बैठकीत प्रस्ताव परत पाठवला होता. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने आज माहिती देताना संबंधित पुलांचे ऑडिट देसाईने केले असले तरी पुन्हा सर्व पुलांची तपासणी पालिकेच्या अभियंत्यांनी केल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि दुरुस्ती सुरू असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. प्रशासनाकडून ही माहिती दिल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याचे जाहीर केले.

प्रस्तावातील देसाईचे नाव वगळले
शहरातील पुलांची दुरुस्ती देसाईच्या सल्ल्यानुसार करण्यात येत असल्याचा उल्लेख प्रस्तावात होता. यावर सर्वपक्षीयांनी आक्षेप घेतला. देसाईला काळय़ा यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना, पालिकेच्या सल्लागार पॅनलकरून त्यांना हटकण्यात आले असताना, त्याच्या ऑडिटरला अटक केली असताना त्याचे नाव असलेल्या प्रस्तावाला मंजुरी कशी देता, असा सवाल करीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपसूचना मांडली.

मुंबईतील पुलांची सद्यस्थिती

  • शहर आणि दोन उपनगरांत एकूण 344 पूल
  • 296 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले
  • 110 पूल चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल
  • 107 पुलांची दुरुस्ती आवश्यक
  • 61 ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू
  • 18 पूल अतिधोकादायक-मोडकळीस
  • अतिधोकायकपैकी 7 पूल पाडले
  • 11 धोकादायक पूल वापरासाठी बंद

या पुलांची दुरुस्ती
ग्रॅण्ट रोड रेल्वेवरील पूल, ऑपेरा हाऊस पूल, फ्रेंच पूल, फॉकलॅण्ड रोड (डायना ब्रिज), ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल, वाय. एम. उड्डाणपूल, सीताराम सेलम काय ब्रिज उड्डाणपूल, ईस्टर्न फ्री वे, सर पी डि’मेलो पादचारी पूल, डॉकयार्ड रोड पादचारी पूल, प्रिसेन्स स्ट्रीट पादचारी पूल

या भुयारी मार्गांची दुरुस्ती
हाजी अली भुयारी मार्ग, सीएसटी भुयारी मार्ग, चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग, चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग.
या प्रस्तावानुसार 16 पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी 13 कोटी 86 लाख, 40 हजार 89 रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनीकडून दुरुस्तीचे काम करून घेण्यात येणार आहे.