सामना ऑनलाईन । मुंबई
पालिकेचे तब्बल 11 हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामाला पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पालिकेचा कारभार थंडावणार असून मूलभूत सुविधांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढणार आहे.
निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारात निर्देश दिल्यानंतर पालिका प्रशासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठवणे बंधनकारक असते. हे आदेश पाळले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होणे, अटक होणे अशी कारवाई होऊ शकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 90 हजार कर्मचाऱ्यांपैकी 11 हजार कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
नागरिकांची गैरसोय होऊ देणार नाही!
11 हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी पाठवण्यात आले असले तरी नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल असा विश्वासही पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.



























































