पोलिसाला शिवीगाळ, लायकीत रहा; ‘BMW’ चालकाला मुजोरपणा कॅमेऱ्यात कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिजमोहन पाटील । पुणे

वाहतूक कोंडी झालेली असल्याने पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊनही गर्दीत बीएमडब्लू घुसविणाऱ्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी आडविल्याने कारमधून खाली उतरून ‘तू माझी गाडी का आडवली, तू सरकारी नोकर आहेत, तुझा पगार किती’ असे विचारून शिवीगाळ करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला मुंढवा पोलिसांनी अटक केली. चिराग राजेंद्र सातव (वय 27, रा. जयराय बंगलो, भैरवनाथ मंदीराजवळ, वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

मुंढवा वाय जंक्शनच्या ठिकाणी सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास वाहतूक पोलीस राजू नारायण निकम (45) हे वाहतूक नियमन करत होते.मुंढवा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने निकम यांनी बीएमडब्लू कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. तरीही त्याने त्याची कार गर्दीमध्ये आणुन थांबवल्याने आणखी वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी राजू निकम यांनी कारचालकाकडे चौकशी केली. त्याचा राग आल्याने सावत आणि इतर दोघे कारमधून उतरले. त्यांनी शिवीगाळ करत निकम यांना धक्काबुक्की केली. ‘तु माझी गाडी का आडवली, लायकीमध्ये रहा, तुझा पगार काय आहे? असे वारंवार विचारून, अश्लिल शब्द वापरले. यावेळी दुसऱ्या कर्मचाऱ्याने या घटनेचा मोबाईलवर व्हीडीओ काढला होता. तो पुरावा मानुन पोलिसांनी सातववर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. त्यास लष्कर न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यास न्यायालयीन कोठडी सुनावून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. वरिष्ठ निरीक्षक अनिल पात्रुडकर, उपनिरीक्षक अमित वाळके यांनी हा तपास केला.