
बीकेसी येथील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत बॉम्बस्फोटाच्या धमकीच्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. फोन करणाऱयाने त्याची ओळख सांगितली असून तो गुजरातचा रहिवासी आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अंबानी शाळेत फोन आला. तो फोन रिसेप्शनिस्टने उचलला. आपण शाळेत टाइम बॉम्ब बसवला आहे. कोणत्याही क्षणी शाळा बॉम्बस्फोटाने उडवली जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने आणखी एक फोन आला. फोन करणाऱयाने त्याची ओळख सांगितली. आपण गुजरात येथे राहत आहोत. पोलिसांनी आपल्यास पकडल्यास आपण प्रसिद्ध होऊ. त्यामुळे हे सर्व करत असल्याचे सांगून फोन कट केला. शाळा प्रशासनाने बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. बॉम्बस्फोटाच्या धमकीचा फोन करणाऱयाचा पोलीस शोध घेत आहेत.


























































