
सामना ऑनलाईन । वर्धा
वर्ध्यातील देवळी तालुक्यात सेलसुरा येथील शेतशिवारात पुन्हा बोंड अळीचे पतंग आढळून आले आहेत. मागील हंगामात कापुस उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणुन बोंड अळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला होता. कपाशी फस्त करून शेतकऱ्यांना त्रस्त करणाऱ्या बोंड अळीचे पतंग जिल्ह्यात इतरही शेतामध्ये असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. आढळलेल्या पतंगामुळे शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या चमूने सेलसुरा येथील शेतकऱ्यांच्या आणि कृषी विज्ञान केंद्रातील शेतामध्ये कामगंध सापळे लावले होते. आठवड्याभरात ठिकठिकाणी लावलेल्या या सापळ मध्ये बोंड अळीचे नर पतंग अडकले आहेत. या पतंगाचे प्रमाण काही दिवसात वाढण्याची शक्यता कृषी विज्ञान केंद्राने वर्तविली आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आत्ताच सतर्क होऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात जिनिंग अँड प्रेसिंगचे कारखाने आहेत त्या भागात याचे प्रमाण जास्त असणार आहे. जिनिंग अँड प्रेसिंग कारखान्यांमधून निघणारा अळीचा अंश परिसरातील वातावरणात पसरत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे पतंग अंडी घालत असल्याने याचे प्रमाण वाढणार हे निश्चित आहे.
मागील हंगामात शासकिय अहवालानुसार, एकूण २,१२,९५२ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आला होते. एकूण २ लाख २५ हजार ८९ हेक्टर शेतीमध्ये नुकसान झाले होते. सरकारनं बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतही जाहीर केली होती. परंतु अद्यापही बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. मात्र बोंड अळी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पुन्हा एकदा पोहचली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि कृषी विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वेळीच उपाय केले नाही तर यावर्षीही शेतक-यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून बोंडअळीमुळे नुकसान वाढण्यापूर्वीच उपाय योजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


























































