
>> अस्मिता प्रदीप येंडे
आयुष्यभर सत्य, अहिंसा, शांती या त्रिसूत्रीवर ठामपणे जीवन व्यतीत करणारे गांधीजी, त्यांचे जीवन, त्यांचे कार्य बालमित्रांपर्यंत पोहचणे तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन पिढी ही देशाचे भवितव्य असते. त्यामुळे या पिढीवर चांगले संस्कार घडावे आणि गांधीजींचे कार्य त्यांच्या पर्यंत पोहचावे यासाठी व्यास क्रिएशन्सने गांधीजी थेट गोष्टीरूपातून बालवाचकांपर्यंत आणले आहेत. लेखक रामदास खरे लिखित ‘गोष्टीरूप गांधीजी’ हे पुस्तक वाचले आणि असे जाणवले की, अशा थोर महापुरुषांच्या गोष्टी मुलांना सांगितल्या पाहिजेत.
मुलांना गोष्टी-कथा यांचे आकर्षण असते. त्यामुळे मुलांच्या कलाने घेऊन, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून कुमार गटासाठी या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. गांधीजींच्या जीवन प्रवासातील महत्त्वाच्या घटनांवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. ज्या घटनांमुळे गांधीजींच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले अशा घटना गोष्टीरूपात मांडल्या आहेत. अगदी मुलांना सहज आकलन होईल अशी भाषाशैली असल्याने लेखात नेमकेपणा आहे.
गांधीजींचा जन्म, त्यांचे बालपण, आई-वडील, भावंडं, शालेय शिक्षण, महाविद्यालयातले दिवस, बॅरिस्टर होण्याचे स्वप्न, दक्षिण आफ्रिकेतील अनुभव, अन्यायाविरुद्ध केलेली आंदोलने, सत्याग्रह, असहकार, हिंदुस्थानातील लढे, अहिंसेची शिकवण, चंपानेर आणि खेडा सत्याग्रह, चरखा आणि खादीचा जन्म, मिठाचा सत्याग्रह, छोडो भारत आंदोलन, त्यांच्या आयुष्यातला शेवटचा क्षण इत्यादी महत्त्वाच्या घटना या पुस्तकात समाविष्ट आहेत.
पोरबंदर येथे बालपण व्यतीत केलेले मोहनदास महात्मा राष्ट्रपिता होण्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात जाणून घेण्यासाठी ‘गोष्टीरूप गांधीजी’ एक योग्य मार्गदर्शक आहे.
प्रेम, दया, शांती, करुणा, क्षमा, अहिंसा या शब्दांचा खरा अर्थ जाणून घेण्याची गरज आहे. हे विचार गांधींनी दिले. साधी राहणी उच्च विचारसरणी हा मंत्र त्यांनी दिला. स्वावलंबनाचे धडे दिले. खेडय़ाचे महत्त्व जाणून ‘खेडय़ांकडे चला’ असा नारा त्यांनी दिला. गांधीजींची विचारसरणी, त्यांची तत्त्वे, मूल्ये आदर्शवत आहेत. नव्या पिढीसाठी ‘गोष्टीरूप गांधीजी’ हे पुस्तक प्रेरणादायी तर आहे. जीवनात कायम तत्त्वनिष्ठ राहणे सहजसाध्य नाही. आयुष्यभर ही तत्त्वं पाळणारे गांधीजी गोष्टीच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न प्रशंसनीय आहे. हे पुस्तक पुस्तकप्रेमी, शालेय विद्यार्थी यांना उपयुक्त आहे. गोष्टीतून ज्ञानरंजन ही संकल्पना पुस्तकात अतिशय सुरेख व्यक्त झाली आहे.
गोष्टीरूप गांधीजी
लेखक : रामदास खरे
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स
मूल्य : रुपये 125/-





















































