
>>मकरंद मुळे
समर्थ रामदास यांनी श्रीराम भक्तीतून शक्तीचे जागरण केले होते. व्रतस्थ युवकांचे संघटन उभारले होते. प्रपंच आणि परमार्थ याच्या संतुलनावर नेमकेपणाने भाष्य केले होते. तीच परंपरा पुढे नेणाऱयांतील एक अग्रणी नाव सुनील चिंचोलकर यांचे होते. समर्थव्रती हे विशेषण सर्वार्थाने सुनील चिंचोलकर यांच्यासाठी योग्य ठरते. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हा समर्थांचा गुण विशेष आणि त्याच्या सोबत उत्कटता यातून व्यक्त होणारे सुनील चिंचोलकर हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. जगरहाटीत मिसळलेले, संसारात रमलेले आणि तरीही संन्यस्तपणे वावरणाऱया सुनील चिंचोलकर यांनी समर्थ कार्य पुढे नेले.
समर्थभक्तीने भारलेले आणि तरीही अखंड सावध असणाऱया सुनील चिंचोलकर यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त पुस्तक प्रकाशित करण्याची योजना मोरया प्रकाशनाने आखली. सुनील चिंचोलकर यांच्याशी जोडलेल्या विविध घटना, प्रसंग, आठवणी, त्यांची प्रवचनं आणि लिखाण याचे संकलन करण्यात आले. त्याचे संकलन करून दिलीप महाजन आणि डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी यांनी समर्थव्रती सुनील चिंचोलकर पुस्तक लिहिले आहे. समर्थव्रती हे पुस्तक तीन भागात आहे. पहिल्या भागात पाच प्रकरणात सुनील चिंचोलकर यांचे बालपण, शिक्षण, जडणघडण, समर्थ संस्काराचा झालेला स्पर्श, पुण्यात निवास आणि सांसारिक जीवनाची घडी याची माहिती आहे. दुसऱया भागात सोळा प्रकरणात प्रत्यक्ष समर्थ कार्याचा आढावा घेतलेला आहे. तिस्रया प्रकरणात अध्यत्मिक आणि अन्य क्षेत्रातील जाणकारांनी सुनील चिंचोलकर यांच्या गुणांवर भाष्य केले आहे. स्वामी गोविंददेव गिरी, चैतन्यमहाराज देगलूरकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, पद्मश्री निवेदिता भिडे, मोहनबुवा रामदासी, डॉ. अशोक कामत अशा पंधरा जणांनी लिहिले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद पेंद्र, रामकृष्ण मठ यांच्याशी संबंधित असलेल्या सुनील चिंचोलकर यांचा जन्म 1951 साली झाला होता. 2018 साली त्यांचे निधन झाले. शालेय शिक्षण मनमाड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथे पूर्ण करून वालचंदनगर येथे शिक्षक म्हणून तीन वर्षे नोकरी केली होती. त्यानंतर बारा वर्षे सज्जनगड येथे व्यवस्थापक म्हणून सुनील चिंचोलकर यांनी काम केले होते. सज्जनगड आणि रघुवीर समर्थ मासिकांचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली होती. सज्जनगड येथून पुण्यात आल्यावर साधारण पाव शतक त्यांनी आध्यात्मिक विचारांच्या प्रसाराला वाहून घेतले होते. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर तसेच, विदेशात सुमारे बारा हजार प्रवचने सुनील चिंचोलकर यांनी दिली होती. 1951 ते 2018 असा सुनील चिंचोलकर यांचा जीवनपट समर्थव्रती सुनील चिंचोलकर या पुस्तकातून सुलभतेने रेखाटलेला आहे.
पुस्तकाचे अचूकतेने संपादन करणाऱया दिलीप महाजन यांनी मनोगतातून आपल्या कर्तृत्ववान मित्राचे केलेले वर्णन भावस्पर्शी आहे. डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी यांनी आपल्या वडिलांविषयी केलेल्या भावना हृदय आहेत. चिंचोलकर-गोस्वामी कुटुंबावर झालेला वज्राघात आणि त्यातून सावरत उभे रहाणे या कसोटीच्या काळातील वडील-मुलीच्या नात्यातील हळवेपण आणि समजूतदारपणाची भावना याचे पुस्तकातील चित्रण परिणामकारक आहे. समर्थ भक्तीच्या मार्गावर चालताना आपल्या दैनंदिन व्यवहारातून, सामाजिक कामातून समर्थव्रतीपर्यंत असे एक वेगळे प्रवास वर्णन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.
समर्थव्रती सुनील चिंचोलकर
लेखक : दिलीप महाजन,
डॉ. अपर्णा गोस्वामी – चिंचोलकर
प्रकाशक : मोरया प्रकाशन, डोंबिवली
मूल्य : रुपये 250/-
























































