
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठपुराव्यामुळे बोरिवली येथील नॅन्सी कॉलनी रस्त्याची मालकी मुंबई महानगरपालिकेला मिळाली आहे. त्यामुळे आता हा रस्ता पालिकेला सिमेंट-काँक्रीटचा बनवता येणार आहे.
नॅन्सी कॉलनी रस्त्याची मालकी गेली 15 वर्षे खासगी मालकांकडे होती. त्यामुळे हा रस्ता पालिकेला बनवता येत नव्हता. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. त्याची दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, प्रभाग क्रमांक 5 चे माजी नगरसेवक संजय घाडी व प्रभाग क्रमांक 11 च्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी या रस्त्याची कायदेशीर मालकी पालिकेला मिळवण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर पालिकेला त्याची मालकी मिळाली.
लवकरच या रस्त्याचे सिमेंट-काँक्रीटाकरणाचे काम करता येणार आहे. गेली अनेक वर्षे महानगरपालिका, सरकारकडे अनेक बैठका अधिकाऱयांसोबत घेतल्याने हे यश मिळाल्याचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे व संजय घाडी यांनी स्पष्ट केले. शिवसेना विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, उपनेत्या संजना घाडी यांच्या उपस्थितीत शनी मंदिर, चोगले नगर, बोरिवली येथे सभा घेत या कार्याचा श्रीफळ वाढवून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी विधानसभा संघटक अशोक म्हामुणकर, शाखाप्रमुख संदीप शेलार, सुबोध माने, उपशाखाप्रमुख सुरेश महाडिक, विजय साळवी, अशोक भोसले, पटवर्धन, घाडी, शेखर जाधव, प्रसाद नाडकर, मनीष प्रभू, प्रदीप नेगी, आकाश परब, रेखा गुरव, प्रमोद दिवाडकर आदी उपस्थित होते.

























































