शूटिंगसाठी गोव्यात गर्दी! राज्यातील संचारबंदीमुळे निर्मात्यांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चित्रपट-मालिकांच्या शूटिंगवरही बंदी घातली आहे. त्यामुळे ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत चित्रपट-मालिकांच्या निर्मात्यांनी आता शूटिंगसाठी गोव्याची वाट धरली आहे. सध्या डझनभर चित्रपट, मालिका आणि वेबसीरिजचे शूटिंग गोव्यात सुरू असून येथील हॉटेल्स, बंगले, फार्महाऊस बुक करण्यात आले आहेत.

संचारबंदीच्या घोषणेआधीच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाची टिम दुसऱया शेडय़ूलच्या शूटिंगसाठी गोव्यात पोहोचली आहे. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून गोव्यात बॉलीवूड कलाकारांची गर्दी वाढली आहे. लवकरच विद्युत जामवालच्या ‘सनक’ या चित्रपटाच्या शेवटच्या शूटिंगचे शेडय़ूल येथे होणार आहे. सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी निर्मात्यांनी विशेष खबरदारी घेतली आहे. सेटवर जेवढय़ा लोकांची आवश्यकता आहे तेवढय़ाच लोकांना एंट्री मिळणार आहे.

‘मनू और मुन्नी की शादी’ या चित्रपटासाठी श्रेयस तळपदे शुक्रवारी गोव्यात पोहोचला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून त्याने ही माहिती दिली आहे. अभिनेता शाहीद कपूरदेखील गोव्यात सध्या आपल्या वेबसीरिजचे शूटिंग करतोय. या वेबसीरिजचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रशासन झाले सतर्क

गोव्यात अचानक चित्रपट, मालिकांच्या शूटिंग वाढल्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. गोव्यात चित्रपट, मालिका, वेबसीरिजचे शूटिंग करत असाल तर त्याची संपूर्ण माहिती एन्टरटेन्मेंट सोसायटीला देणे आणि ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. गोव्यातील चित्रपटाच्या शूटिंगवर देखरेख करण्याचे काम येथील एन्टरटेन्मेंट सोसायटी करते.

मालिकाही झाल्या शिफ्ट

संचारबंदीचा फटका डेली सोपला बसू नये यासाठी काही मालिकांच्या निर्मात्यांनी देखील पुढील काही दिवस गोव्यात शूटिंग करण्याचे ठरवले आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’, ‘अपना टाईम भी आऐगा’, ‘तुझसे है राबता’ तसेच कलर्सवरील ‘मोलक्की’, ‘इश्क मे मरजावा 2’ या मालिकांची टीम शूटिंगसाठी गोव्यात पोहोचली आहे.

कोरोनाची साखळी तोडलीच पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे मी स्वागत करते. मालिकांच्या प्रसारणात खंड पडू नये, लोकांचे मनोरंजन अविरत सुरूच राहावे यासाठी आमची टिम पुढील काही दिवस संपूर्ण काळजी घेऊन गोव्यात शूटिंग करणार आहे. सेटवर मालिकेच्या टीमशिवाय कुणालाही परवानगी नसेल.
– पूजा बॅनर्जी, अभिनेत्री, ‘कुमकुम भाग्य’