
तामीळनाडूमधील तंजावर जिह्यातील पट्टूकोट्टाई येथे राहणाऱया लक्ष्मीप्रभाचे नुकतेच लग्न झाले. लग्नात तिला असं काही गिफ्ट मिळालं की तिचे कुटुंबीय, नातेवाईक, पाहुणे सारेच चकीत झाले. सगळीकडे गिफ्टचीच चर्चा रंगली. लक्ष्मीप्रभाचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. हे गिफ्ट म्हणजे बहिणीने तिला दिलेला दिवंगत वडिलांचा पुतळा.
त्याचे झाले असे की, नववधू लक्ष्मीप्रभाचे वडील सेल्वम मूर्ती यांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून वडिलांच्या आठवणीत लक्ष्मीप्रभा दु:खी असायची. ती वडिलांच्या खूपच जवळ होती. वडिल म्हणजे तिचे गुरु, मार्गदर्शक होते. आपला लग्नात वडिल नसणार, याचा विचार करूनही ती उदास व्हायची. लंडनमध्ये लक्ष्मीप्रभाची बहीण भुवनेश्वरी राहते. भुवनेश्वरीने लग्नात वडिलांचा पुतळा भेट देऊन तिला सरप्राईज करायचं ठरवलं.
बंगळुरूमध्ये मेणाच्या पुतळा तयार करणाऱया सिद्धार्थ मूर्ती या कलावंताकडून तिने पुतळा तयार करून घेतला. पुतळा सिलिकॉन, रबर, वॅक्स आदी साहित्याचा वापर करून तयार करण्यात आला. आपले वडील पुतळ्याच्या रूपात लग्नात उपस्थित असल्याचे पाहून वधू लक्ष्मीप्रभा फारच खूष झाली. सर्व कुटुंबीयांनी पुतळ्यासोबत फोटोही काढले. हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक होता.


























































