आंगणेवाडी यात्रा नियोजन बैठकीत ‘बीएसएनएल’ धारेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

आंगणेवाडी यात्रा नियोजनाची बैठक प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर परिसरात पार पडली. या बैठकीत ग्रामस्थ मंडळ आणि उपस्थितांनी बीएसएनएलच्या सेवेवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान सेवेत सुधारणा कराव्यात अश्या सूचना प्रांताधिकारी यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांना दिल्या.

दरवर्षी या यात्रेत गर्दीचे नवनवीन उचचांक पाहायला मिळतात. येत्या २५ फेब्रुवारीला आंगणेवाडीची यात्रा होत असल्याने ग्रामस्थ मंडळासह प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून गुरुवारी मंदिर परिसरात यात्रेची नियोजन बैठक प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला कणकवलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटक्के, परीक्षाविधीन डीवायएसपी श्रीमती के. जी. फडतरे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेन्द्र सावंत्रे, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे, रामदास आंगणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, नायब तहसीलदार गोसावी, सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी मार्फत १२५ गाड्या सोडल्या जाणार आहेत. २४ ते २६ फेब्रुवारी पर्यंत २४ तास एसटी सेवा सुरु राहणार असून ओरोस, कुडाळ रेल्वे स्थानकातून थेट आंगणेवाडीत बसेस सोडल्या जाणार आहेत. मालवण आगारातून ४६, कुडाळ आगारातून २९, कणकवली आगारातून २५, देवगड आगारातून १३ तर विजयदुर्ग आगारातून ५ बसेस सोडल्या जाणार असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याठिकाणी ६ मॅकेनिक, ३ सुपरवायझर देखील उपलब्ध असतील असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वीजवितरण कंपनी मार्फत ५ ट्रान्सफॉर्मर मधून वीज सेवा दिली जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरटीओ मार्फ़त मालवण आंगणेवाडी आणि कणकवली आंगणेवाडी मार्गावर दोन पथके वाहतूक नियोजनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आरोग्य विभागाची पथके याठिकाणी सज्ज असून ५ रुग्णवाहिका तैनात केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीत बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेवरून ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्यासह ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अलीकडे सातत्याने बीएसएनएलच्या सेवेत अडथळे निर्माण होत आहेत. मोबाईल सह लँडलाईन सेवाही ठप्प असून मालवण कार्यालयात तक्रारी मांडण्यासाठी गेलो असता अधिकारी नीट उत्तरे देत नाहीत. दूरध्वनी बंद ठेवताय का? असा सवाल भास्कर आंगणे यांनी केला. उपसभापती अशोक बागवे, सभापती सोनाली कोदे यांनी देखील बीएसएनलच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

पाणी प्रश्नावरही यावेळी चर्चा झाली. यावर्षी डिसेंबर महिन्यातच येथील विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. यात्रेला आठ ते दहा लाख भाविक येणार असल्याने या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे. बागायत मध्ये पाण्याचे स्रोत असून येथील पाणी टँकर द्वारे आगणेवाडीत आणून व्यापारी आणि ग्रामस्थांना दिल्यास प्रत्यक्ष यात्रेदिवशी कोणतीही पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे नरेश आंगणे म्हणाले.
पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी दिली. याठिकाणी कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मात्र यात्रा कालावधीत काही विभागांच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी नॉट रिचेबल असतात. या प्रकाराबाबत पोलीस निरीक्षक चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.