
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, 1 मार्चपासून सुरू होत आहे. कोरोना, मराठा आरक्षण, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, शिक्षक आंदोलन यांसारख्या मुद्दय़ांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची हवा विरोधकांनी केली आहे. मात्र सत्ताधारी अधिकच आक्रमक झाले असून इंधन दरवाढ आणि महागाईवरून विरोधकांची हवाच काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट आहे. या सावटातच 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याबरोबरच वेळेत कर्ज भरणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद होण्याची शक्यता आहे.
z अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर होतील. गेल्या दोन अधिवेशनांत तारांकित प्रश्नोत्तराचा तास झाला नव्हता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मात्र प्रश्नोत्तराचा तास होणार असून लक्षवेधी सूचना मात्र स्थगित ठेवण्यात आल्या आहेत.
अर्थसंकल्प 8 मार्चला
– पेट्रोल डिझेलवरील कर कमी होणार
– वेळेत कर्ज भरणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहनपर अनुदान
संसर्ग रोखण्यासाठी…
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विधान भवनातील अंतर्गत सजावटीला नवा लूक देण्याचे काम वेगाने सुरू आहे. विधान भवनातील जुन्या लाद्या बदलून चकचकीत संगमरवरी लाद्या, रंगकाम वेगाने सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सभागृहात निगेटिव्ह प्रेशरची यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याशिवाय जागोजागी सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहेत. अधिवेशनाच्या काळात संपूर्ण विधान भवनाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण होईल. कोरोनाची चाचणी केल्याशिवाय विधान भवनाच्या आवारात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.






























































