
पांढराशुभ्र मुळा पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कुणी सलाड म्हणून मुळा खातं तर कुणाला मुळ्याची भाजी खायला आवडते. आजवर आपण अनेकदा मुळा पाहिला आहे. पण बुलढाण्यातील मुळ्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. येथील एका शेतकऱयाने एक, दोन नव्हे तर तब्बल नऊ किलोचा मुळा पिकवला आहे. सध्या सर्वत्र या मुळ्याचे फोटो व्हायरल होत असून अनेकांनी त्याचं ‘मॉन्स्टर मुळा’ असं नामकरण केलंय.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमधील गौत्रा गावातील रामनाथ मुंडे या शेतकऱयाने आपल्या शेतात नऊ किलोचा मुळा पिकवला आहे. याबाबत मुंडे म्हणाले, नेहमीप्रमाणे मी यंदाही शेतात मुळ्याचे पीक घेतले. पिकांना योग्य प्रमाणात खतपाणी घातले. मुळा काढायला गेलो तेव्हा एक मुळा बाहेर काढण्यासाठी मला खूप मेहनत लागली, पण जेव्हा तो मुळा शेतातून बाहेर काढला तेव्हा माझ्यासह उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुळ्याचे वजन तब्बल नऊ किलो आहे. पुढे ते म्हणाले, हा मुळा सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. आजूबाजूच्या गावात ही बातमी पोहोचल्यानंतर लोकही आमच्या शेतात हा मुळा पाहण्यासाठी येत आहेत. एवढा मोठा मुळा आम्ही कधी पाहिलाच नाही, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.





























































