
झारखंडमधील सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्षातील आमदार पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित 18 ठिकाणी ईडीने छापे टाकले. या काळात ईडीने एक आरोपी हिरा भगत यांच्या घरातून तब्बल 3 कोटींचे घबाड सापडले आहे. सोशल मिडीयावर या छाप्यात सापडलेल्या नोटांचे फोटो व्हायरल झाले आहे. या नोटा नेमक्या कोणाच्या आहेत, असा सवाल अनेकांनी केला आहे.
साहिबगंज,बरहेट आणि राजमहल येथील पंकड मिश्रा यांच्याशी संबंधित 18 ठिकाणी शुक्रवारी ईडीने छापे टाकले. हा घोटाळा खनिज घोटाळ्याशी संबंधित आहे. ही रोकड एवढी मोठी होती की त्याची मोजणी अधिकारी अनेक तास करत होते. ही रोकड तब्बल तीन कोटींची आहे. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
या व्हायरल झालेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. झारखंडमध्ये खजिना सापडला, मोठे घबाड सापडले, एवढी मोठी रक्कम आपण पहिल्यांदाच पाहत आहोत, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. झारखंड हे संपन्न राज्य आहे. खनिकर्म विभआग आणि ईडी राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, असे एका युजरने म्हटले आहे.
हे प्रकरण मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित खनन भाडेपट्टा आणि शंल कंपन्यांच्या भागीदारीबाबत आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने चौकशी करण्याची मागणी जनहित याचिकेव्दारे करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यादरम्यान ईडीने टाकलेल्या छाप्यात मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही रक्कम नेमकी कोणाची, याची चर्चा सुरू आहे.

























































