पोटाची खळगी भरण्यासाठी परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांची कुलूपे तोडून अन्नधान्य इंडिका गाडीत भरून पलायन करणार्या `बंटी-बबली’च्या मुसक्या कर्जत पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे.
अमोल रमेश सुलताने (मूळ रा. किनखेड, ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, हल्ली राहणार कनगर, ता. राहुरी) व गीता अमोल सुलताने अशी ताब्यात घेतलेल्या बंटी-बबलीची नावे आहेत, तर त्यांचे साथीदार सुनील सुभाष बर्डे, अनिल ऊर्फ भीमराज निकम (रा. राहुरी) हे फरार आहेत.
कर्जत तालुक्यातील येसवडी गावच्या शिवारात ऊसतोडणीसाठी आलेल्या आप्पा धनंजय भिल्ल (रा. काकडदा, ता. शाहदा, जि. नंदुरबार) या ऊसतोड मजुराच्या बंद कोपीचे कुलूप तोडून कोपीतील 100 किलो बाजरी आपल्या इंडिका कारमधून आरोपी घेऊन जात असताना पोलिसांनी अमोल सुलताने, गिता सुलताने या दोघांना राशीन येथे ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अमोल सुलताने व अनिल निकम यांनी गणेशवाडी येथून शेळ्यांची चोरी केल्याबाबत कबुली दिली आहे. आरोपी अमोल याच्यावर मूर्तिजापूर शहर आणि मूर्तिजापूर ग्रामीण या ठिकाणी 12 गुन्हे दाखल आहेत. हेड कॉन्स्टेबल काळे, तुळशीराम सातपुते तपास करत आहेत.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाट, सहायक फौजदार तुळशीराम सातपुते, हेडकॉन्स्टेबल मारुती काळे, अण्णासाहेब चव्हाण, कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊ काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे यांनी ही कारवाई केली आहे.




























































