
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले असून टोळीतील मुख्य आरोपीवर 52 गुन्हे दाखल आहेत. रत्नागिरी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह 19 लाख 94 हजार 829 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली.चिपळूण तालुक्यात दिवसा घरफोडीचे गुन्हे सुरु होते. सर्व घरफोड्यामध्ये साम्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि चिपळूण पोलिसांनी मेहनत घेत तपास सुरु केला. या तपासात सीसीटिव्हीच्या फुटेजमध्ये चंदेरी रंगाची अर्टिगा गाडी दिसून आली.पोलिसांनी पुढे तपास सुरु ठेवला.त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा ही गाडी चिपळूणात फिरताना दिसली. तेव्हा पोलिसांनी गाडीच्या नंबर वरून मूळ मालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडून आरोपी कैलास चिंतामण मोरे, वय ३८, रा. धुळे हा साहिल पटेल या बोगस नावाने गाडी घेऊन जात होता, अशी माहीती मिळाली मात्र खरे नाव माहित नसल्याने त्याचा शोध आव्हानात्मक होते.
तमाशा पहायला गेला आणि सापडला
पोलीस कैलास मोरेच्या मागावर असताना धुळे येथे तो तमाशा पहायला गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून त्याला पकडले. त्यानंतर जयप्रकाश राजाराम यादव वय 30 रा.वाराणसी उत्तरप्रदेश, अजय कटवाल वय 24 रा.धुळे आणि शरद उर्फ रावसाहेब नामदेव मोरे वय 28 रा.सिंदखेडा यांना अटक केली. पाचवा आरोपी विरेंद्रसिंग ठाकूर रा.उत्तरप्रदेश याला अजून अटक करण्यात आली नाही. आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिरीष सासने,वाहतूक निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते.
म्होरक्यावर 53 गुन्हे
मुख्य आरोपी कैलास मोरेवर 53 गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांना काही गुन्ह्यात अटकही झाली आहे. त्यांनी चिपळूणात सात घरफोड्या केल्या आहेत. ही कारवाई सदरचा गुन्ह्रांचा तपास पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिरीष सासने, देवेंद्र पोळ पोलीस निरीक्षक चिपळूण पोलीस स्टेशन, विलास पड्याळ पोलीस उपनिरीक्षक, प्रदीप गमरे पोलीस हेडकाँन्स्टेबल, गगनेश पटेकर पोलीस नाईक, योगेश नार्वेकर पोलीस काँन्स्टेबल, आशिष भालेकर पोलीस काँन्स्टेबल, पंकज पडेलकर यांनी केला आहे.


























































