
ठाणे परिवहन सेवेचा बस स्टॉप रातोरात गायब झाला असून हिवाळय़ातील कडक उन्हात बसची वाट पाहणाऱया ठाणेकरांचे प्रचंड हाल होत आहेत. कुणाच्या आदेशावरून हा बस स्टॉप गायब झाला, असा प्रवाशांचा सवाल आहे.
महिनाभरापूर्वी वागळे इस्टेट 16 नंबर येथे ठाणे परिवहन सेवेचा हा बस स्टॉप होता, मात्र अचानक एक जेसीबी आला आणि सर्वांच्या डोळय़ादेखत हा बस स्टॉप उखडून तो निघून गेला. त्यानंतर काही दिवस तो स्टॉप तेथेच फुटपाथवर कलंडून ठेवण्यात आला होता. पण नंतर मात्र महापालिकेची गाडी आली आणि स्टॉप घेऊन गेली.
दिवसाढवळय़ा उखडलेला स्टॉप रातोरात गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तो गायब झालाच कसा आणि कुणाच्या आदेशावरून, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. बस स्टॉपच नसल्याने ठाणेकरांना मात्र रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे.




























































