
गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कुटुंबातील कर्ता पुरुष सैफुद्दीन दुधियावाला (45 वर्षे) हे उद्योजक होते आणि त्यांचा कटलरी व्यवसाय होता. सैफुद्दीन यांच्यासह त्यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. विष पिऊन या सगळ्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सैफुद्दीन यांच्या घरातून पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही मिळाली आहे. पोलिसांना संशय आहे की या कुटुंबाने आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली असावी.
गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील रहिवासी असलेले दुधियावाला हे बातूल अपार्टमेंटमध्ये राहात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माहझबीन (35 वर्षे) 16 वर्षांच्या दोन जुळ्या मुली आणि एक 7 वर्षांची मुलगी राहात होते. या सगळ्यांनी आत्महत्या केल्याची आणि त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सैफुद्दीन यांचे वडील शब्बीर नोमान दुधियावाला यांनी पोलिसांना दिली होती. सैफुद्दीन यांचा वापरून फेकून देता येतील अशा ग्लास आणि ताटल्या बनवण्याचा व्यवसाय होता.
सैफुद्दीन आणि कुटुंबाने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत पोलीस तपास करत आहेत, मात्र प्राथमिक तपासात आर्थिक संकटामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे दिसते आहे. पोलिसांनी सैफुद्दीन यांचे आर्थिक व्यवहार तपासायला सुरुवात केली असून त्यांच्यावर कर्ज किती होतं याचा शोध लावला जात आहे. पोलिसांना सैफुद्दीन यांच्या घरात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. सैफुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्येसाठीची पूर्ण तयारी आधीच केली होती असंही पोलिसांना दिसून आलं आहे. आत्महत्येपूर्वी सैफुद्दीन यांनी त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या नातेवाईकांकडे पाठविले होते. त्यांची धाकटी मुलगी ही नातेवाईकांकडे होती, तिलाही घरी बोलावून घेण्यात आले होते असे पोलीस उपअधीक्षक परेश सोलंकी यांनी सांगितले आहे.




























































