
पूर्व उपनगरातील नशेबाजांसाठी कोडेन फॉस्फेटच्या बाटल्या, निट्रावेट आणि अल्प्राटेन (बटन) च्या गोळ्या विकण्यासाठी घेऊन आलेल्या तिघा ड्रग्ज तस्करांना आरसीएफ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून चार लाख 37 हजार रुपये किमतीचा ड्रग्ज साठा हस्तगत करण्यात आला.
आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण मांढरे व त्यांचे पथक माहूल रोड परिसरात गस्त घालत असताना त्यांना पाहून बीपीसीएल पंपनी गेटसमोर उभ्या असलेल्या काळ्या पिवळ्या इको कारमधील तीन व्यक्ती घाबरले व ते पळून जाऊ लागले. टॅक्सीमधील लोकांचे हे वागणे संशयास्पद वाटल्याने मांढरे व त्यांच्या पथकाने देखील पाठलाग करून ती कार थांबवली. त्यानंतर पोलिसांनी कारची तपासणी केली असता दोन निळ्या रंगाच्या पिशव्या मिळाल्या. त्या पिशव्यांमध्ये कोडेन फॉस्फेटच्या 100 बाटल्या, निट्रावेट 10 च्या 375 गोळ्या, अल्प्राटेन 1 च्या 685 गोळ्या असा ड्रग्ज साठा सापडला. त्यामुळे पोलिसांनी हा ड्रग्ज साठा घेऊन आलेल्या हनिफआज मोहम्मद शेख, रेहान खान आणि सचिन लामा अशा तिघांना पकडले.
हनिफकडे अधिक चौकशी केली असता त्याने रे रोड परिसरात आणखी कोडेन फॉस्फेटच्या बाटल्या ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी रे रोड गाठून कोडेन फॉस्फेटच्या आणखी 125 बाटल्या हस्तगत केल्या. सचिन आणि रेहान हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.




























































