RBI च्या पतधोरणाआधी 3 बँकांकडून कर्जदरात वाढ; घराचा, गाड्यांचा हप्ता वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन पतधोरण जाहीर करण्यापूर्वीच तीन बड्या बँकांनी कर्जधारकांचे टेन्शन वाढवले आहे. कॅनरा बँक (Canara Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि करुर वैश्य बँकेने (Karur vysya Bank) आपल्या व्याजदरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घराचा आणि गाड्यांचा हप्ता वाढणार आहे.

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) 0.35 टक्क्यांनी वाढवला आहे. 7 जून 2022 नवीन कर्जदर लागू होणार असल्याचे बँकेने जाहीर केले आहे. यामुळे कर्जाचे हप्ते वाढणार आहे. नव्या दरानुसार एमसीएलआर 7.15 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांवर गेला आहे. एका महिन्यासाठीचा एमसीएलआर वाढून 7.20 वरून 7.55 टक्के तर तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर 7.60 आणि सहा महिन्यांसाठी 7.70 टक्के झाला आहे. एक वर्षांसाठीचा 7.85, दोन वर्षांसाठी 7.95 आणि तीन वर्षांसाठीचा 8.05 टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तित कर्ज महागणार आहे.

आठवडाभरात दुसऱ्यांदा वाढ

एचडीएफसी बँकेने एका आठवड्यात दुसऱ्यांदा कर्जदरात वाढ केली आहे. याआधी बँकेने 1 जून 2022 रोजी गृहकर्जाच्या रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली होती. एमसीएलआर मध्ये वाढ झाल्याचा परिणाम प्रत्येक प्रकारच्या कर्जावर पाहायला मिळतो. एमसीएलआर वाढल्यामुळे घर, गाड्या आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जदरात वाढ होते.

कॅनरा बँकेचाही दणका

कॅनरा बँकनेही कर्ज महाग केले आहे. एका वर्षाच्या मुदतीतील एमसीएलआरमध्ये 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे याचा रेट आता 7.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. 6 महिन्यांसाठीचा एमसीएलआर वाढून 7.30 टक्क्यांवरून 7.35 टक्क्यांवर गेला आहे. हे दर आजपासून लागू होणार आहेत.

करुर वैश्य बँकेचेही कर्ज महागले

खासगी क्षेत्रातील करुर वैश्य बँकेने देखील कर्जदर वाढवले आहेत. करुर वैश्य बँकेने बीपीएलआरमध्ये 0.40 टक्के वाढ केली असून बेसिस पॉइंटमध्येही 0.40 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बीपीएलआर 13.75 आणि बेसिस पॉइंट 8.75 वर पोहोचले आहेत.