नाणारवरून सलग तिसऱया दिवशी विधिमंडळात गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नागपूर

‘नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे’ ही शिवसेनेची आक्रमक भूमिका आजही कायम राहिली. नाणारवरून सलग तिसऱया दिवशी शिवसेना सदस्यांनी विधिमंडळात गदारोळ घातला. भूमिअधिग्रहणाची अधिसूचना आजच रद्द करा! प्रेझेंटेशन नको, नाणार रिफायनरी हटवा, अशा जोरदार घोषणांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले.

आज प्रश्नोत्तरांच्या तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रश्नावर निवेदन करण्यास सुरुवात केली. नाणारमधील भूमिअधिग्रहण रद्द करण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची सूचना असलेली फाइल आपल्याकडे आली आहे, मात्र त्यावर अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वांनाच प्रेझेंटेशन देऊन विश्वासात घेऊनच निर्णय घेणार असे सांगत प्रकल्प नाणारवासीयांवर लादणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मात्र त्याने शिवसेना सदस्यांचे समाधान झाले नाही.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आम्हाला प्रेझेंटेशन नको तर हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा आजच करा, अशी मागणी केली. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्थगनची मागणी केली. नाणारमध्ये मोठय़ा प्रमाणावर बोगस कागदपत्रांच्या आधारे भूसंपादन झाले आहे. तेथील नागरिक लाँगमार्च करीत नागपूरला आले आहेत तेव्हा हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करा असे ते म्हणाले. काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. मात्र मुख्यमंत्र्यांकडून कोणतेच उत्तर न आल्याने शिवसेनेच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन ‘नाणार जाणार’, ‘नाणार हटाव, कोकण बचाव’ अशा घोषणा दिल्या. त्याला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनीही साथ दिली. यामुळे झालेल्या गोंधळातच चार विधेयके मंजूर करीत सभागृहाचे कामकाज १५-१५ मिनिटांसाठी तीनदा आणि चौथ्यांदा दिवसभरासाठी बंद झाल्याची घोषणा अध्यक्षांनी केली.

कॅबिनेटला विश्वासात घेऊन निर्णय घेतला का? -विखे-पाटील

नाणार प्रकल्प आणताना केंद्रामध्ये शिवसेनेचे मंत्री केंद्रात आहेत. त्यांना विश्वासात घेण्यात आले होते का? त्याच प्रमाणे राज्याच्या मंत्रिमंडळात या प्रकल्पाविषयी निर्णय घेण्यात आला होता का, असा सवाल विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केला. मात्र आता विश्वासात घेण्याचे मुख्यमंत्री बोलत असून त्यापेक्षा स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेऊन अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करावी, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.

प्रकल्प लादता येणार नाही – मुख्यमंत्री

हा प्रकल्प आम्हाला नाणारवासीयांवर लादायचा नाही. समृद्धीचा प्रश्न ज्याप्रमाणे चर्चेने सोडवतोय त्याप्रमाणे हा प्रश्नही चर्चेने सोडवू. या प्रकल्पाचे नव्याने इनव्हायरमेंट ऍनेलिसीस करण्यात येत आहे. या प्रकल्पाबाबत सर्व नेत्यांशी आमची चर्चेची तयारी आहे. प्रकल्प लादता येणार नाही, पण लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणावर आपत्ती कोसळेल! – सुनील प्रभू

गाडगीळ समितीच्या अहवालानुसार नाणार प्रकल्पामुळे तेथील १२ लाख आंब्याची झाडे, नारळ, काजू, औषधी वनस्पतींचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होणार आहे. मच्छीमारांचा रोजगारही बुडणार आहे. जांभा दगडाखाली असलेल्या सल्फरडाय ऑक्साइडचे उष्णतेमुळे स्फोट होतील आणि नैसर्गिक आपत्ती कोसळेल, असे शिवसेनेचे सुनील प्रभू म्हणाले.

नाणार जाणार…हो की नाही? – जयंत पाटील

शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केला आहे. तेथील स्थानिक जनतेचाही विरोध आहे. सभागृहात विरोधी पक्षांचाही शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा असल्याने सरकार अल्पमतात आले आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प रद्द करणार… हो किंवा नाही एवढेच सांगावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली.