
सामना ऑनलाईन । मुंबई
विरार येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी माहिती देणाऱ्याला सीबीआयने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले काहे. सीबीआयच्या विशेष पथकाकडून आरटीआय कार्यकर्ता प्रेमकांत झा यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. मंगळवारी याबाबत सीबीआयने मराठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन हत्येप्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
विरार येथील आरटीआय कार्यकर्ते प्रेमकांत झा यांचा मृतदेह 24 फेब्रुवारी 2012 रोजी विरार हायवेवर आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला अपघाती मृत्युची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रेमकांत मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याने हेल्मेटमधून त्याच्यां डोक्यात गोळी घुसली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने ऑक्टोबर 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने 2016 मध्ये या प्रकरणी दोन जाणांना अटक केली होती. प्रेमकांत हे भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी समिती या सामजिक संस्थेचे सदस्य होते. त्यांनी विरारमधील अधीकृत बांधकामबाबत अनेक तक्रारी करून अधिकृत बांधकामांची महिती मागवली होती. दरम्यान, प्रेमकांत झावर अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचा देखील आरोप होता.




























































