मायकल आलाय… कोणता मासा अडकणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

‘ऑगस्टा वेस्टलँड’ हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ब्रिटिश नागरिक ख्रिस्तियन मायकल हिंदुस्थानच्या ताब्यात आल्यामुळे देशातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून मायकलने तोंड उघडल्यास कोणता बडा मासा अडकणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी न्यायालयाने मायकलला पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

2012 चा ‘ऑगस्टा वेस्टलँड’ घोटाळा मंगळवारी देशभरातील चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सीबीआय पथकाने मंगळवारी रात्री दुबईहून मायकलला नवी दिल्लीत आणले. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारात कंत्राटासाठी मायकलने मध्यस्थ म्हणून काम करताना कंपनीकडून 283 कोटी रुपयांची लाच घेतली. देशातील अतिवरिष्ठ पदांवरील व्यक्तींनाही कोट्यवधीची लाच दिल्याचा आरोप आहे.

मायकल तोंड उघडणार का?

  • बुधवारी कडेकोट बंदोबस्तात ख्रिस्तियन मायकलला पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील डी. पी. सिंह यांनी, तर आरोपी मायकलच्या वतीने ऍड. अल्जो जोसेफ न्यायालयात हजर होते.
  • मायकलकडून महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती घ्यायची आहे. दुबईतील दोन बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर झालेली आहे. यासह अनेक महत्त्वाची माहिती मायकलकडून घ्यायची आहे. त्यामुळे त्याला 14 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकील डी. पी. सिंह यांनी केली. कोठडीत मायकलची कसून चौकशी होईल. या चौकशीत मायकल कोणती माहिती देतो, कोणत्या बड्या माशाचे नाव घेतो यावरून यापुढील काळात देशाचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

दूध का दूध, पानी का पानी होईल- अहमद पटेल
ऑगस्टा वेस्ट लॅण्ड प्रकरणातील एक दलाल ख्रिस्तियम मिशेल याची चौकशी ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता दूध का दूध, पानी का पानी होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केली आहे. मिशेल याच्या चौकशीच्या प्रकरणात कायदा आपले काम करेल असेही ते म्हणाले.

काय आहे घोटाळा?

  • देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीव्हीआयपी) इटलीतील कंपनी फिनमेकानिकाची उपकंपनी असलेल्या ‘ऑगस्टा वेस्टलँड’कडून 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 2010 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारकडून करण्यात आला.
  • 3546 कोटींचा हा करार होता. 12 मधील 8 हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान, अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर 4 अन्य कारणासाठी वापरली जाणार होती.
  • तत्पूर्वी 2005 मध्ये निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. पहिल्या निविदामध्ये हेलिकॉप्टर 6000 मीटर उंचीपर्यंत काम करतील (सर्व्हिस सीलिंग) अशी अट घातली होती, मात्र 2006 मध्ये ही अट शिथिल करून 4500 मीटरची केली. अट शिथिल केल्यामुळे ‘ऑगस्टा वेस्टलँड’ला कंत्राट मिळाले. ही अट बदलण्यात माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांचा हात होता असा आरोप आहे.
  • कंत्राट मिळविण्यासाठी लाचखोरी झाल्याचे 2012 मध्ये समोर आले. 2013 मध्ये यूपीए सरकारचे तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टोनी यांनी हा सौदा रद्द करण्याची घोषणा केली. 1 जानेवारी 2014 ला हा करार रद्द केला, मात्र करार रद्द होईपर्यंत हिंदुस्थानने ‘ऑगस्टा वेस्टलँड’ला 1620 कोटी रुपये दिले होते.
  • या सर्व घोटाळ्यातील दलाल मायकलला कंपनीने 283 कोटी रुपयांची लाच दिली होती. तसेच हिंदुस्थान आणि इटलीतील काही व्हीव्हीआयपींना 423 कोटींची लाच दिल्याचा संशय आहे.
  • माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांच्या तीन पुतण्यांना कोट्यवधीची लाच दिल्याचा आरोप आहे.
  • मायकलने हिंदुस्थानातील दोन दलालांमार्फत एक मीडिया कंपनी स्थापन करून त्यात पैसे ट्रान्सफर केले.
  • दुबईतील ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीच्या खात्यातील पैसे जमा केले.

मायकल सर्वांची पोलखोल करेल
सुमेरपूर : ‘ऑगस्टा वेस्टलँड’ घोटाळा ‘यूपीए’ सरकारच्या काळात झाला होता. 2014 मध्ये मी भाषणात या घोटाळ्यातील एका चिठ्ठीचाही खुलासा केला होता. ती चिठ्ठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची होती. आता या घोटाळ्यातील एक मासा हाती आला असून तो सर्वांचीच पोलखोल करेल. तेव्हा अनेकांना झळ बसेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील प्रचारसभेत सांगितले. लाच प्रकरणातील एक राजदार (मायकल) सीबीआयच्या जाळ्यात आला आहे. हिंदुस्थानातील काही नामदारांना तो लाच द्यायचा. मायकल जेव्हा पोलखोल करेल तेव्हा अनेकांना पळता भुई थोडी होईल, असेही मोदी म्हणाले.