चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ : सीबीआय आरोपपत्रात नाव

13
p-chidambaram

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली 

एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सीबीआयने पतियाळा हाऊस कोर्टात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचे नाव समाविष्ट केले आहे. त्यामुळे चिदंबरम यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

सीबीआयने या प्रकरणात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात चिदंबरम यांच्यासह १७ जणांची नावे समाविष्ट आहेत. त्यात सेवेत असलेल्या आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्यावर आधीच या प्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला असून ईडीने आधीच चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे. दिल्लीतील एका कोर्टाने चिदंबरम यांना १० जुलैपर्यंत अटक करू नये असा मनाई आदेश दिला होता. त्याचबरोबर आवश्यकता भासेल तेव्हा चौकशीला हजार राहण्याचे निर्देश चिदंबरम यांना दिले होते.

एअरसेल मॅक्सिस प्रकरणी सीबीआय आणि ईडी चौकशी करत आहेत. २००६ मध्ये चिदंबरम अर्थमंत्री असतानाचे  हे प्रकरण आहे. याप्रकरणी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याला अटक झाली होती  व नंतर त्याची  जामिनावर सुटका झाली होती.  सप्टेंबर २०१७ मध्ये ईडीने कार्ती याची  १.१६ कोटींची संपत्तीही जप्त केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या