
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत २०१४ ते २०१६ या काळात १६ ते २५ वयोगटातील ३२ हजार ५९८ मुले बेपत्ता होत आहेत. या तीन वर्षांत १६ हजार ५३३ महिलांचे अपहरण होत आहे. हे अपहरणाचे गुन्हे रोखण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या, असा जाब शिवसेनेने सभागृहात विचारला. यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी देतानाच बालकांचे अपहरण रोखण्यासाठी झोपडपट्टी भागात जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. ‘मुस्कान’ आणि ‘स्माईल’ अंतर्गत २० हजार ११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली आहेत, अशी माहिती दिली.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडताना राज्यात तीन वर्षांत मोठय़ा प्रमाणावर लहान मुले, महिला यांचे अपहरण होत आहे. त्याचप्रमाणे १८ वर्षांवरील ६१५० पुरुष बेपत्ता असल्याची बाब निदर्शनास आणली. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३२ हजार ५९८ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी २९ हजार ५०५ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या कालावधीत १६ ते २५ वयोगटातील १६ हजार २८१ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील १४ हजार १४१ व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.
हरवलेल्या व्यक्ती शोधण्यासाठी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांत प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १८ वर्षांखालील हरवलेल्या लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्यांच्या आत हरवलेले मूल सापडले नाही तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबईतील सर्व परिमंडळांत असे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रताप सरनाईक यांनीही अपहरणाचे प्रकार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.



























































