
जे.डी.पराडकर, संगमेश्वर
मराठी महिन्यातील तसे सर्वच महिने वैशिष्ट्यपूर्ण आहेत . तरीही सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावण हा मनभावन म्हणून ओळखला जातो . अनेक नामवंत कवींनी श्रावण महिन्याचं सुरेख वर्णन केले आहे. ऊन पावसाचा सुंदर खेळ , या खेळात क्षणात पडणारं सप्तरंगी इंद्रधनुष्य , व्रतवैकल्यांमुळे पवित्र असणारं वातावरण , आनंदानं सर्वत्र विहार करणारे पक्षी , राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोरांचं पिसारा फुलवून दृष्टीस पडणारे सुंदर नृत्य , पोटाला आराम देण्यासाठी केले जाणारे उपास , सायंकाळच्या वेळी केळीच्या पानावर घेतलं जाणारं वरण – भाताचं भोजन , सोमवारी शिवमंदिरात होणारे नामस्मरणाचे कार्यक्रम ! अशा अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला श्रावण म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग !
आताच्या बदलत्या वातावरणातील श्रावणही काहीसा बदलला आहे . बालपणीचा श्रावण आत्ताच्या मोठ्या मंडळींच्या नजरेसमोर तरळू लागला , तर तुलना करणं कठीण होवून जाईल . बालपणी अनुभवलेला श्रावण मनात वेळोवेळी इंद्रधनुष्य फुलवणारा होता . श्रावणातील वाऱ्याच्या मंद लहरीवर मन अक्षरशः हवेत तरंगत हवं तेथे जावून विसावायचं . स्वप्नातील या आनंददायी खेळाने तनंच सप्तरंगी होवून जायचं . श्रावण महिन्यातील या जुन्या आठवणी आजही बेचैन करणाऱ्या ठरतात . पावसाळ्यात मुलांच्या खेळांवर बंधनं येतात . श्रावण सुरु झाला ,की मुलांचे बैठे खेळ सुरु होतात . यामध्ये काचेच्या गोट्यांचा खेळ सर्वाधिक आवडीचा . एखाद्या छोट्याशा आडोशाला तासनतास पाच , सात मुलांचा समुह तासंतास या खेळात रमून जातो. या खेळादरम्यानची मुलांची होणारी आरडाओरड, वादविवाद आणि गोड होणारा शेवट , सारं कसं अगदी ठरवल्यासारखं घडायचं . काचेच्या रंगीत गोट्या जिंकणं आणि त्या साठवणं म्हणजे मुलांना श्रीमंत असल्यासारखं वाटायचं . याबरोबरच सिमेंटचे मोठे रोठ हे या खेळातील खास आकर्षण मानलं जायचं. या खेळाचा दुसरा साथीदार म्हणजे डबाऐसपैस ! डबा एका रिंगणातून दूर फेकत तो जागेवर आणून साथीदारांना शोधण्याचा हा आगळावेगळा खेळ ! हे खेळ साधारणपणे श्रावण महिन्यात खेळले जात असल्याने हे खेळ वैशिष्ट्यपूर्ण ठरतात .
निसर्गाच्या हिरव्या सौंदर्यात विविध रंगांची उधळण करुन निसर्गदेवतेच्या शिरपेचात विविधरंगांचे आणि गंधाचे वळेसर माळण्यासाठी श्रावण महिन्याचाच प्रारंभ व्हावा लागतो . पाऊस कमी होत काहीसे ऊन पडले , की माळरानावर इवल्याशा रानफुलांचे ताटवे आपले अस्तित्व दाखवून देतात . या रानफुलांचं फुलणं ,म्हणजेच श्रावण महिन्याच्या स्वागता प्रसंगी निसर्ग देवतेला झालेला आनंदाचा परिपाक म्हटला पाहिजे . माळरानावरुन चालताना नकळत पायाखाली येणारी ही रानफुलं काही वेळाने मानवाच्या नाजूक तळव्यांचा स्पर्श सुखावह मानून अलगद परत उभं राहण्यात आणि वाऱ्याच्या लहरीसंगे डोलण्यात मग्न होतात . हे सारं ज्या महिन्यात अनुभवायला आणि मनभरुन पाहायला मिळतं , तो महिना म्हणजेच श्रावण ! म्हणूनच याचं वर्णन मनभावन श्रावण असे केले जाते ‘
श्रावण महिन्यात मुलींदेखील छापापाणी , संत्र लिंबू पैशा – पैशाला या खेळात रममाण झाल्याचे पाहायला मिळते , तुलनेत शहरात या खेळांबाबात फारशी माहितीही असणार नाही. श्रावण महिना या आगळ्यावेगळ्या खेळांचा जसा आनंद देतो तसा हा महिना संस्कार करणारा म्हणूनही ओळखला जातो . व्रतवैकल्यांमुळे पवित्र महिना म्हणून दर्जा प्राप्त झालेल्या श्रावण मासात मांसाहार , मद्यपान , कांदा – लसूण वर्ज्य केले जाते . विज्ञानाची जोड लाभल्याने श्रावणाचं महत्व अधिक वाढलं . श्रावणातील या नियमांचं ग्रामीण भागात आजही काटेकोर पालन केलं जातं . यामुळे शरीरा बरोबरच मनालाही अपेक्षित स्वास्थ्य लाभतं . श्रावण महिन्यातील सोमवार तर शिवभक्तांच्या आनंदाला पर्वणीच असते . शिवमंदीरातून केल्या जाणाऱ्या नामस्मरणाला शे – सव्वाशे वर्षांची परंपरा लाभली आहे . एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या प्रथा – परंपरा हस्तांतरीत होत आल्या आहेत . यामुळेच संस्कार होण्यास मोठा हातभार लागतो.
मंगळागौरीचं व्रत हा तर महिलांच्या आनंदाची परिसीमा गाठणारा सोहळा ठरतो . नवीन लग्न झालेली स्त्री सलग पाच वर्षे मंगळागौरीचं व्रत करते . मंगळागौर खरी रंगते ती पन्नास – साठ महिला एकत्र आल्यावरच . मंगळागौरी दरम्यान खेळावयाचे विविध खेळ आता टी . व्ही . तसेच मालिकांमुळे अधिक लोकप्रिय होत घरोघरी पोहचले आहेत . श्रावण जवळपास महिनाभर महिलांना विविध प्रकारे आनंदी ठेवत असतो . मंगळागौरीसह अन्य व्रतांमुळे एकमेकांकडे जाणं – येणं होतं आणि यातून स्नेहभाव वाढत जातो . श्रावण महिन्यात प्रत्येक वाराची आणि व्रताची घरोघरी कहाणी वाचली जाते . या कहाणीत चुकीचं वागू नये असे संदेश दिलेले आहेत . या कहाणी वाचनातूनही बालगोपाळांवर उत्तम संस्कार होत असतात. यासाठी प्रत्येक घरातून कहाणी वाचना दरम्यान मुलांना आवर्जून ऐकायला बसवले जाते .
राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मयुराचा श्रावण महिना हा तर मिलन कालावधी मानला जातो . ऊन पावसाच्या लपंडावात आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी मोर आपला पिसारा फुलवून भान हरपल्या सारखा नाचू लागतो . ग्रामीण भागात खास करुन गाई-म्हशी चरवणाऱ्या मंडळींना हे नेत्रदीपक मयुर नृत्य पाहायला मिळतं . श्रावणाच्या या विविध छटा अचंबित करणाऱ्या आहेत .
विविध प्रकारच्या दाराजवळ केलेल्या गावठी भाज्या श्रावणातच उपलब्ध होतात . त्यांची चव आणि गंध त्या तयार करण्याआधीही लाजवाब असतो. या गावठी भाज्यांची चव अविट करण्याचं काम केळीचं पान करत असते . श्रावण महिन्यात अनेकदा केळीच्या पानावर भोजन करण्याची संधी मिळते आणि याच वेळी खऱ्या अर्थाने भोजनाचं महत्व आणि चव दोन्ही कळते . पशु – पक्षांसह , पानं , फुलं , वेली अशा निसर्गातील प्रत्येक घटकाला चैतन्य देणारा श्रावण मानवाने व्रतं – वैकल्यांची जोड देवून अजून विशिष्ट उंचीवर नेत मनभावन केला आहे.




























































