नवी पहाट (जिवलग)

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अदिती सारंगधर

डॉ. मकरंद चव्हाण… लौकिकार्थाने सेलिब्रिटी नसूनही प्राण्यांसाठी मात्र खऱया अर्थाने देवदूत असणारे….

सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा… छान छान पुस्तकं… मालिका… माणसं… कलाकृती तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला आनंद मिळो.
जिवलगचा सुरू झालेला नव्या वर्षातला प्रवास. आज या प्रवासात आपल्याबरोबर आहेत डॉ. मकरंद चव्हाण… गायनाकॉलॉजी विषयातलं डॉक्टरांचं स्पेशलायजेशन प्राण्यांतलं… आता मी त्यांच्याशी बोलायचं का? ठरवलं तर नेहमी पेशंट म्हणून ट्रीट न करता ‘जिवलग’ म्हणून जिवापाड प्रेम करून त्यांची काळजी घेणारे असे डॉक्टर..

मुळातले मुंबईकरच… पण अगदी लहानपणापासून रत्नागिरीमध्ये (गावी) सततच जाणं असल्याने (आजोळी) प्राणी, पक्षी यांच्याच सहवासात, सान्निध्यात मी मोठा झालो. गावाला गेलं की पहिलं घरी असणाऱया गाईच्या गोठय़ात जायचो यांच्याशी गप्पा मारायचो… जणू सुट्टीत भावंडांना भेटल्याचा आनंद साजरा करायचो आणि मग घरात जायचो… कुत्रं… मांजरं… घरातलीच. त्यांना आधी जेवू घालायचो. कधी कधी ताटातलंच ओरडा खाऊनसुद्धा आणि मगच मी जेवायचो… खरंच गावी असताना वेगळीच मजा असायची. त्यामुळे अगदी शाळेत असतानाच ठरवले होतं प्राण्यांचं डॉक्टर व्हायचं. (तेव्हा त्यांना व्हेटरनरी वगैरे म्हणतात माहीतही नव्हतं.)

मुंबईच्या बॉम्बे व्हर्लेंटरी कॉलेज म्हणून गायनाकॉलॉजी या विषयात सुवर्णपदक मिळवले. मुंबई गोरक्षक मंडळींची ‘स्कॉलरशीप डॉक्टरांना मिळाली. युजी आणि पीजी करताना परळच्या बीएसपीसीए ऑनिमल हॉस्पिटल, तसेच मुंबई व्हेटरनरी कॉलेजमधल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेत शिक्षण पूर्ण केलं आणि गेली 19 वर्षे दादर, शिवाजी पार्कला डॉग्स ऍण्ड कॅट व्हेटेरीनरी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतोय. तसंच आयडीए (डिफेन्स ऑफ ऑनिमल्स) आणि डब्लूएसडी (वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स) सारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये मी व्हिजिटिंग सर्जन आहे. घरगुती पाळीव प्राणी तसेच स्ट्रे (रस्त्यावरचे) प्राणी खरं तर सगळ्यांचीच काळजी घ्यायला वा घेणे मी एन्जॉय करतो. मुळात माझं प्रोफेशन मी एन्जॉय करतो.
एक प्रसंग सांगतो. शाळेत असताना मी आणि काही मित्र रस्त्यावरच्या कुत्र्यांशी खेळायचो व त्यांची काळजी घ्यायचो. मांजरांची आणि बऱयाचदा लहान बच्चूंना व्हायरल पकडायचा. त्यांचा मृत्यू व्हायचा अचानक… काही उपाय करण्याच्या आधीच… तेव्हा वाटलं आपण प्रयत्न करायचे सगळ्यांना वाचवायचे… चांगलं आयुष्य द्यायचं… आणि गेली सगळी वर्षे हेच ध्येय ठेवून सेवा करतोय. जवळजवळ 50 हजार ऑनिमल कंट्रोल सर्जरीज आणि 5 हजार सॉफ्ट टिश्यू सर्जरीज काही उगाच नाही सक्सेसफूल झाल्या…

डॉक्टर सांगतात, ‘इंटर्नशीप करत असताना एका डॉबरमनची क्रिटीकल डिलिव्हरी करायची होती. खरं तर तिला वाचवायचं की पिल्लांना… इतकी कठीण परिस्थिती असतानासुद्धा आम्ही तिच्यासकट सगळ्या पिल्लांना वाचवू शकलो. सगळी पिल्लं हेल्दी होती. त्या सगळ्या पिल्लांची मीच दिवसभर काळजी घेतली आणि त्याच दिवशी मनात पक्कं केलं की, व्हेटरनरी गायनॅकॉलॉजीमध्ये मास्टर्स करायचं. त्याच उद्देशातून काही वर्षांपूर्वी गुजरातच्या भुजमध्ये मोठ्ठा भूकंप झाला होता. तेव्हा प्राण्यांना वाचवण्यात, बाहेर काढण्यात डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरांचा मोलाचा वाटा होता.

एखादे बाळ जेव्हा अत्यवस्थ होऊन त्रासात, दुःखात माझ्याकडे येतं तेव्हा त्याच्या डोळ्यात बघून कळतं की त्याला काय त्रास आहे… प्राणी कुठलाही असो त्याला प्रेमाने जवळ घेतलं, शांतपणे त्याच्याशी बोललं की त्याचा अर्धा त्रास हलका होतो. कधीकधी त्यांना नक्की काय होतंय कळायला वेळ लागतो. अशावेळी मी माझ्या मनातला आवाज ऐकतो. बऱयाचदा ते बरोबर असतं. कोण म्हणतं प्राण्यांना बोलता येत नाही… मूक असतात… माझ्या उपचारानंतर बरे होणारे सगळे मी हातात धरून बघितलेत. प्रत्येक वेळी होणारी प्रगती… कमी होणारा त्रास ते स्पर्शातून कम्युनिकेट करतात. त्या फिलिंग्ज, तो स्पर्श मी शब्दात नाही व्यक्त करू शकत… अशा प्रत्येक रात्री लागणारी शांत झोप हेच त्याचं उत्तर… माझ्याकडे येणारा प्रत्येक पेट आणि त्याचे पालक ही माझी फॅमिली असते. या फॅमिलीमध्ये सगळे हेल्दीच राहावेत म्हणूनच तर मी प्रयत्न करतोय. पण पेट पॅरेंट्सना योग्य असं शिस्तीचं आयुष्य जगायला लावतोच. ‘स्ट्रीक्ट आहेत हं डॉक्टर, पण आपल्या पेटच्या भल्यासाठीच’ असं म्हणताना ऐकलंय मी पॅरेंट्सना… एखाद्या विशिष्ट जमातीचं पिल्लू घेताना मी त्यांना त्यांची लाइफस्टाइल कशी असावी याचं पूर्ण ज्ञान देतोच. डूज ऍण्ड डोण्ट्स सांगतोच, पण काळजी घेत जमणार नसेल तर दुसरी ट्रीट ऑप्ट करायचा आग्रहही धरतो.
एक प्रसंग सांगतो, एक ऑनिमिक कुत्रा क्लिनिकमध्ये आला. हिमोग्लोबीन अत्यंत कमी होतं. जगणार की नाही इतका प्रसंग होता. त्याचा ब्लड ग्रुप मिळत नव्हता. इतक्यात लक्षात आलं की माझ्या सहाय्यकाचा जो डॉग आहे त्याचा सेम ब्लड ग्रुप आहे. धावत जाऊन ती त्याला घेऊन आली आणि बिस्कीट डोनर बनला. आलेल्या कुत्र्याचा जीव वाचला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग… खरंच त्या दिवशी डोळ्यात हसू आणि आसूचे अश्रू होते आणि मनात समाधान…

आपण जेवढं प्रेम करतो त्याच्या कैक पटीने अधिक ते प्रेम करतात आपल्यावर. हे लक्षात ठेवलंत की आपोआप उत्तम संगोपन कराल तुम्ही. माझ्याकडे असणाऱया, येणाऱया सगळ्या पेशंट्स आणि त्यांच्या फॅमिलीजमुळे माझं आयुष्य खरंच सतत एक्सायटिंग झालंय. आनंदी झालंय. रोलर कोस्टर राइड…

मी माणूस म्हणून बदललोय… अधिक समृद्ध झालोय या प्राण्यांच्या सहवासात आणि केवळ मीच नाही तर माझं अख्खं कुटुंब…शेवटी इतकंच सांगेन की मनापासून माझं काम, प्रोफेशन हा माझ्या जगण्याचा मार्ग आहे. दिशा आहे… ध्यास आहे आणि प्राण्यांचं आयुष्य अधिक सुंदर आणि सुकर करण्यासाठी मी कायम… कायम प्रयत्नशील राहीन…