पण ताकाने दुधाची तहान भागतेय का…?

>> शिबानी जोशी

आज कोरोनामुळे प्रत्येकावर अशी परिस्थिती आली आहे की, ‘गो डिजिटल.’ एक काळ असा होता की, आपण घरातल्या लहान मुलांना म्हणायचो, मोबाईल वापरू नका, डोळे बिघडतात, पण आज याच मोबाईलवर शिक्षण घेण्याची वेळ मुलांवर आली आहे. घरातली ज्येष्ठसुद्धा आधी ऑनलाइन बँकिंग करायलाही तयार नव्हती, ती आता ऑनलाइन बँकिंग काय, फेसबुकवरसुद्धा ऍक्टिव्ह झाली आहेत. व्हॉट्सऍप हा तर घरातल्या आबालवृद्धांचा खराखुरा मित्र झाला आहे. झूमऍप आणि वेबिनारला तर खूपच मागणी आली आहे. आज घरोघरी नातेवाईकांचे ग्रुप तयार झाले आहेत आणि झूमच्या माध्यमातून विविध ठिकाणी राहणारे नातलग एकत्र येऊन गप्पागोष्टी करू लागले आहेत. सहा-सात महिन्यांत एकमेकांना भेटता न आल्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्याकडे सर्वांचा कल दिसून येत आहे. शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे, गरज शोधाची जननी असते. प्रत्यक्ष भेटण्यात जो आनंद असतो, तो असा डिजिटल माध्यमातून मिळत नसला तरी निदान आपल्या माणसांना बघण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आता या सर्व समाज माध्यमांतून केला जात आहे. सर्वसामान्य माणसं काय किंवा कलाकार काय, प्रत्येक जण सामाजिक, आर्थिक, मानसिक गरजेपोटी डिजिटल माध्यमांचा उपयोग करू लागला आहे. अनेक उद्योजकही आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी, त्यांची जाहिरात करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग आता जास्त जोरात करू लागले आहेत आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाल्याचे चित्र दिसते आहे.

नवे रसिक जोडले गेले

गाण्यांचे कार्यक्रम हे पण आपल्याकडे खूप जोरात सुरू असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी पहाट, कोजागिरी पौर्णिमा असेल अशा वेळी आपल्याला असे करमणुकीचे, गाण्यांचे कार्यक्रम लागतातच, पण हे सर्व कलाकार, वादक काम नसल्यामुळे गप्प बसून होते. त्यांनीही आता गाण्यांचे कार्यक्रम ऑनलाइन करायला सुरुवात केली आहे. या गाण्यांच्या कार्यक्रमांनासुद्धा काही जणांनी तिकिटं लावली आहेत आणि त्यांनाही बऱयापैकी प्रतिसाद मिळत आहे असं ‘स्वरसाज’च्या अमेय ठाकूरदेसाई याने सांगितले. आतापर्यंत त्याने तीन-चार कार्यक्रम ऑनलाइन तिकीट लावून केले. पहिल्या कार्यक्रमाला दीडशे, दुसऱया कार्यक्रमाला पावणेदोनशे तर तिसऱया कार्यक्रमाला अडीचशे-तीनशे तिकिटं घेतली गेल्याचं तो सांगतो. ऑनलाइन असल्यामुळे भुवनेश्वर इथल्या रसिकांनी पण तिकीट घेतलं होतं असं तो सांगतो. म्हणजेच नवे नवे रसिक या माध्यमामुळे जोडले जाऊ शकतात हेही कळलं. अर्थात थिएटरमध्ये लाईव्ह कार्यक्रम करण्याची मजा अशा कार्यक्रमांना नाहीच.

कलाकारांचे अभिनव प्रयोग

मधुरा वेलणकर या सुप्रसिद्ध अभिनेत्रीनेसुद्धा ‘मधुरव’ नावाचा स्वतःचा एक कार्यक्रम सुरू केला आहे, जो फेसबुकवर लाईव्ह, नंतर यूटय़ूबवरही दिसत असतो. हा कार्यक्रम लाईव्ह आहे आणि विनामूल्य आहे. त्यामुळे तिचा हा कार्यक्रमही अडीच-तीन हजार प्रेक्षक पाहायला असतात. या कार्यक्रमातून अनेक ज्येष्ठ कलावंतांच्या मुलाखती, अनेक नवोदित लेखकांचे लेखन, वाचन असे उपक्रम राबवत असते. मधुरा वेलणकरला स्वतःचं नाव असल्यामुळे ती स्वतः एक चांगलं फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे तिच्या या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो असं तिचं म्हणणं. सुनील बर्वे या प्रथितयश अभिनेत्यानेसुद्धा एक वेगळाच प्रकार ऑनलाइन सुरू केला तो याच उद्देशाने की, नाटय़ कलावंतांनाही काही काम मिळावं आणि रसिकांनाही नाटक नाही, पण नाटकासारखंच काहीतरी बघायला मिळावं. त्यासाठी त्यांनी पाच नाटय़ कलावंतांचे चार ग्रुप तयार करून त्यांना स्वतःचं नाटक लिहून त्यांच्याच घरी ते रेकॉर्ड करून दाखवा असा उपक्रम हाती घेतला.

ई दिवाळी अंक

आता दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळी अंक हा तर आपल्या मराठी साहित्याचा खजिनाच म्हटला जातो हे दिवाळी अंकसुद्धा यंदा ‘ई दिवाळी’ अंकाच्या रूपाने खूप मोठय़ा प्रमाणावर येणार आहेत. त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू आहे. त्यामुळे आर्थिक फायदा फारसा होणार नसला तरीही सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहणं आपल्या कार्यक्रमाची जाहिरात करत राहणं यासाठी डिजिटल मीडियाचा वापर करून कलाकार स्वतःला लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या ‘तरी बुडत्याला डिजिटलचा आधार’.

कवयित्रींसाठी ‘ज्योत’ व्यासपीठ

ज्योती कपिले यांची स्वतःची जेके मीडिया ही प्रकाशन संस्था आहे आणि स्वतः कवयित्री असल्यामुळे त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक कवयित्री मैत्रिणींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा ‘ज्योत’हा उपक्रम सुरू केला. त्यांचं म्हणणं असं की, राम शेवाळकर यांच्यासारख्या एका प्रथितयश अशा विचारवंतालासुद्धा एकेकाळी नैराश्य आलं होतं आणि रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य वाचून त्यांना एकदम स्फूर्ती मिळाली होती. नैराश्यात त्याही या काळात गेल्या होत्या. त्यांच्या वाचनात रवींद्रनाथांचा हा किस्सा आला आणि त्याही त्यातून बाहेर पडल्या व हा उपक्रम त्यांनी सुरू केला. कविताप्रेमींचा चांगला प्रतिसाद याला मिळत आहे. काही काही अनुभव कथनाच्या कार्यक्रमाला तर 25 हजार ह्यूज होत्या असं त्यांनी सांगितलं. अनेक कवयित्रींना त्यामुळे प्लॅटफॉर्म मिळाला. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग या संकल्पनेला जसं लोक आता उचलून धरत आहेत तसेच कलाकारांनी, गायकांनी वादक यांनीही अशाच प्रकारे डिजिटल माध्यमाचा उपयोग करून आपली कला सादर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्येष्ठांनी तंत्र शिकून घेतले. काही काही चांगल्या गोष्टीदेखील यामुळे घडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या