दोन हजार रुपयांच्या नोटेचं काय होणार? केंद्र सरकारने दिले उत्तर

2000-note

 

दोन हजारची नोट बंद होणार का अस संभ्रम गेल्या काही दिवसांत सामान्य नागरिकांमध्ये आहे. तसेच सरकारने दोन हजाराची नोट व्यवहारातून कमी केली आहे. त्यामुळे सरकार दोन हजारची नोट बंद करणार का असा प्रश्न विचारला जात आहे. पण केंद्र सरकारने लोकसभेत यावर उत्तर दिले आहे. दोन हजारची नोट बंद करण्याचा किंवा छपाई बंद करण्याचा कुठलाच निर्णय घेतलेला नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे.

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी लोकसभेत एका लिखित प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, केंद्र सरकार आरबीआयच्या सुचनेनुसार नोटा छापतात, जेणेकरून नागरिकांना मागणी आणि पुरवठामध्ये समनव्य साधला जावा. तसेच दोन हजारची नोट बंद करण्याचा किंवा न छापण्याचा कुठलाच निर्णय सरकारने घेतला नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.

2016 साली  नोटबंदी होऊन 500 आणि एक हजारच्या नोटा केंद्र सरकारने रद्दबातल केल्या होत्या. त्यानंतर सरकारने पाचशेची आणि दोन हजारची नवी नोट आणली होती. गेल्या काही दिवसांत दोन हजारची नोट चलनातून गायब होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा नोटबंदी होऊन दोन हजारांची नोट बंद होणार असा लोकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे सरकार आता दोन हजारांची नोट बंद करणार आहे का? असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला. ही नोट बंद होणार नसल्याचे अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात, 2019-20 साली दोन हजार रुपयांची एकही नवी नोट छापलेली नसून अर्थव्यवस्थेतून, बँकांमधून दोन हजारच्या नोटांचे प्रमाण कमी होत चालले आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात बाजारातून 1 लाख 10 हजार 247 कोटी रुपये मुल्याच्या दोन हजारच्या नोटा कमी झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या