चिंचपोकळीची टाटा पॉवरची केबल वाहणारा पूल मध्य रेल्वे हटविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सुरक्षा तपासणी अहवालात मजबूत ठरविला गेलेल्या आणि अचानक पाच पादचाऱयांचे बळी घेणाऱ्या सीएसएमटी जोड पादचारी पुलाच्या घटनेनंतर हादरलेल्या मध्य रेल्वेने दुधाने तोंड भाजल्याने आता ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आपल्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बांधकामांचा फेरआढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने चिंचपोकळी येथील टाटा पॉवरची केबल जाण्यासाठी बांधलेला लोखंडी पूल हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनच्या हद्दीतील 26 होर्डिंग्जही हटविण्यात येणार आहेत.

सीएसएमटीचा ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या भयंकर घटनेने रेल्वे प्रशासन प्रचंड सावध झाले आहे. पालिका, रेल्वे आणि आयआयटीच्या संयुक्त पथकाने अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर केलेल्या सुरक्षा तपासणीचा अंतिम अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे रेल्वेचे इंजिनीअरिंग विंग पुन्हा आपल्यापरीने सर्व बांधकामांची युद्धपातळीवर तपासणी करीत आहे. धोकादायक बांधकामे, कुंपणाच्या भिंती, ओव्हरहेड वायर्स, पोल, झाडे, जाहिरातींचे फलक, पाइपलाइन, वीजवाहिन्या हटविले जात आहे.

पुलाला लावलेले ‘ओएचई’चे हूक हटविले

ऑक्टोबर 2016 मध्ये पुणे येथे जाहिरातीचे हार्ंडग्ज पडल्याने चार जण ठार तर अनेकजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई विभागात 470 हार्ंडग्ज आढळली. त्यातील 26 जाहिरातींचे हार्ंडग्ज हटविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आयआयटीच्या सूचनांनुसार पादचारी पुलाला लावलेल्या ओव्हरहेड वायरच्या तारांचे हूकसुद्धा काढण्यास सुरुवात केली आहे.

धोकादायक ठरले नाहीत तरी पाडणारच!

या बांधकामांबाबत ते धोकादायक असल्याचा कोणताही निष्कर्ष आतापर्यंत लेखी स्वरूपात आयआयटीने किंवा रेल्वेच्या इंजिनीअरिंग विभागाने दिलेला नाही. तरीही जेथे नवे पर्यायी पादचारी पूल उभारले आहेत तेथील जुने पादचारी पूल ताबडतोब दर आठवडय़ाला ब्लॉक घेऊन पाडण्यात येत आहेत.

टाटाची ‘गॅण्ट्री’ काढून टाकण्याचा निर्णय

ठाण्यामध्ये कोपरी येथे ट्रकवरून जाणाऱ्या पाण्याच्या लाइनचा पूल ट्रेनवरच पडल्याने एका मोटरमनचा मृत्यू झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे चिंचपोकळी येथून ओव्हरहेड वायरवरून टाटा पॉवरच्या वीजवाहिन्यांसाठीचा लोखंडी पुलाचा ढाचाही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी नवीन गॅण्ट्रीचे डिझाईन तयार करण्यात येणार असून त्यातून ट्रकच्या जमिनीखालून वीजवाहिन्यांना नेण्याचा पर्याय सुचविण्यात आला असून तसे डिझाईन रेल्वे टाटाला करून देत आहे. एमएसईबीच्या वीजवाहिन्या ओव्हरहेड वायर्सवरून जात असल्याची 22 ठिकाणे शोधून काढण्यात आली असून त्यामुळे ट्रेन चालविणे बाधित होत आहे. त्यांनाही एक तर जमिनीखालून केबल न्या अन्यथा दुसरा मार्ग निवडा असे सांगण्यात आले आहे.