जेसीबीने अडकली ‘मरे’ची वाट सिग्नल उखडल्याने वाहतुकीचे तीनतेरा कळवा-मुंब्रादरम्यान ‘लटकंती’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन ठाणे,

एमआरक्हीसीकडून सुरू असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामादरम्यान जेसीबीची धडक बसून सिग्नलच उखडल्याने आज कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान भरदुपारी लोकल गोंधळ उडाला. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत ‘मरे’चे तीनतेरा कायम होते. कामावरून घराकडे परतणाऱया चाकरमान्यांनाही या लोकल गोंधळाचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा श्वास कोंडला होता.

मध्य रेल्वेची वाहतूक वेगवान होण्यासाठी एमआरव्हीसीकडून मध्य रेल्वेवर पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र या कामादरम्यान कळवा रेल्वे स्थानकानजीक जेसीबीची सिग्नलच्या खांबाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की येथील सिग्नल यंत्रणाच कोलमडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गाकरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. लोकलसेवा तब्बल 45 मिनिटे उशिराने धावत असल्याने कळवा, मुंब्रा, दिवा स्थानकांवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली होती. त्यातच उद्घोषणा होत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता, तर धीम्या लोकल या बिघाडामुळे फास्ट ट्रकवर वळल्याने प्रवाशांच्या गोंधळात भरच पडली होती.

स्थानकांवर गर्दीचा महापूर

दुपारी झालेल्या लोकल गोंधळाचे चटके सायंकाळी उशिरापर्यंत लोकल प्रवाशांना बसत होते. कल्याण दिशेकडे जाणाऱया लोकल 20 ते 30 मिनिटे उशिराने येत असल्याने ठाणे स्थानकाच्या फलाटांवर एकच गर्दी उसळली. तर फलाटावर येणाऱया लोकलही तुडुंब भरून येत असल्यामुळे  दिवसभर नोकरी धंदा आटोपून घर गाठण्याच्या घाईत असलेल्या चाकरमान्यांना लटकंतीला सामोरे जावे लागले.