मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने; कारण काही कळेना, प्रवासी वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेवरील उपनगरीय गाड्यांची वाहतूक काही ना काही कारणाने उशिराने सुरू असते, मात्र त्याचे कारण बऱ्याचदा दिले जात नाही. त्यामुळे प्रवासी वैतागतात. याचाच प्रत्यय मंगळवारी प्रवाशांना पुन्हा एकदा आला. आज सकाळपासूनच अंबरनाथ-बदलापूर भागातून मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक तब्बल १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू होती. होणाऱ्या विलंबासाठी खेद व्यक्त करण्याशिवाय मध्य रेल्वेवर कोणतीही उद्घोषणा होत नव्हती. विलंबाचे कारणही या वेळी सांगण्यात येत नव्हते त्यामुळे प्रवासी नोकरदारवर्ग वैतागला होता.

बदलापूर येथून सकाळी ६:४७ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल दादर रेल्वे स्थानकावर ८:१४ मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र आज ही लोकल ८:५० मिनिटांनी दादर रेल्वे स्थानकात पोहोचली. मात्र एवढा उशीर होण्याचे कारण रेल्वे स्थानकांवर सांगितले जात नव्हते. त्यानंतर ८:३२ मिनिटांनी दादर येथे पोहोचणारी ठाणे-सीएसएमटी जलद लोकल आज दादरच्या फलाट क्रमांक ६ ऐवजी ३ वर म्हणजेच धीम्या मार्गावरून चालवण्यात आली. यामुळे अनेकांची फजिती झाली. ही जलद लोकल असल्याची उद्घोषणा होताच अनेक प्रवासी पुन्हा खाली उतरले. यावेळी देखील फक्त खेद व्यक्त करणाऱ्या उद्घोषणा सुरू होत्या. मात्र असे करण्यामागचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे सारेच प्रवासी त्रासले होते.