
केंद्रीय यंत्रणांचा वापर करून भाजपाविरोधी पक्षातील नेत्यांना मुद्दाम लक्ष्य करायचे हे काम देशभर सुरू आहे, ते थांबविण्यासाठी सर्व खासदारांनी राष्ट्रपतींना भेटायला हवे, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिक येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
भाजपात आल्याने आपल्यामागे ईडी लागली नाही, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उघडपणे सांगितले, याचा दाखला देत भुजबळ म्हणाले, तिकडे गेल्यानंतर सगळं माफ होतं. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या सरकारी यंत्रणांना भाजपाविरोधी पक्षातले, राज्य सरकारच्या पक्षातीलच नेते दिसत आहेत. राज्य सरकार पाडण्यासाठी सगळे एकतर्फी करणे चुकीचे आहे. आता भाजप नेत्यांनीही काय केले आहे हे समोर आणले जात आहे. फक्त त्रास देण्यासाठीच यंत्रणांचा वापर होऊ नये. मग प्रत्यारोप करण्याचा प्रश्नच येणार नाही. यंत्रणेला यंत्रणेचे काम करू द्यावे. कुणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आरडाओरड करून प्रसिद्धीच्या झोतात राहू नये, असा टोला भुजबळ यांनी किरीट सोमय्या यांना लगावला. महाराष्ट्रातील नेत्यांवर होत असलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घ्यायला हवी. महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे पेंद्र सरकारच्या यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे तेथील मुख्यमंत्र्यांनीसुद्धा पावले उचलायला हवीत. ज्यांना हा त्रास होतोय त्या सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीत जाऊन चर्चा करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.





























































