चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांनी नगरकर धास्तावले, चोरांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर व उपनगरात गेल्या 15 दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे घराबाहेर पडावे की नाही, याची भीती महिलांना वाटू लागली आहे. शहरात वाढत्या तक्रारींमुळे सोनसाखळी चोरांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

बुधवारी (दि. 23) दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून तोडून नेण्याची पहिली घटना दुपारी दोन वाजता नगर-संभाजीनगर महामार्गावर गुरुद्वाराजवळ घडली. दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ाने महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावली आणि उड्डाणपुलावरून तो पसार झाला. दुसरी घटना 2.30च्या सुमारास घडली. या घटनेत भिंगार शहरातील सरपण गल्ली येथे पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावत चोरटय़ाने धूम ठोकली. या अर्ध्या तासाच्या अंतरात घडलेल्या घटनांमुळे घबराट पसरली आहे.

पलक विक्रम चुग (रा. तारकपूर) या दुपारी दुचाकीवरून मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असताना गुरुद्वाराजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन हिसकावून पोबारा केला. महिलेने त्याचा पाठलाग केला. मात्र, तो उड्डाणपुलावरून वेगात पसार झाला. त्यानंतर काही वेळातच संगीता गणेश बारटक्के या पायी जात असताना सरपण गल्ली (भिंगार) येथून चोरटय़ाने त्यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून धूम ठोकली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोन फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

शहर परिसरात असलेल्या कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प तसेच नगर तालुका या सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या 15 दिवसांत चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. चेन स्नॅच्ंिागच्या या घटना पाहता आणि फिर्यादीने दिलेले चोरटय़ांचे वर्णन पाहता या सर्व गुह्यांतील चोरटे एकच आहेत की, वेगवेगळे याचा तपास पोलिसांनी लावण्याची आवश्यकता आहे.

बोलण्यात गुंतवून सोन्याची अंगठी पळविली

z रस्त्याने चाललेल्या व्यक्तीला एका अनोळखी इसमाने हात करून थांबवत त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या दुचाकीला लटकविलेली पिशवी हिसकावून पळ काढला. कोठी चौकात ही घटना घडली. या पिशवीत सोन्याची अंगठी ठेवलेली होती. याबाबत हरिदास नारायण शेळके (रा. बुऱहाणनगर, ता. नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

बीट मार्शल, विशेष पथके नेमा

z काही महिन्यांपूर्वी चेन स्नॅचिंगच्या घटना मोठय़ा प्रमाणात वाढल्या होत्या. त्यावेळी तोफखाना, कोतवाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेने विशेष पथके नेमून चेन स्नॅचिंग करणाऱया टोळ्या पकडल्या होत्या. त्यामुळे काही दिवस घटना थांबल्या होत्या. आता पुन्हा अशा घटना वाढू लागल्याने बीट मार्शल पथकांची गस्त तसेच विशेष पथके नियुक्तीची आवश्यकता आहे.