
महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणाऱ्य़ांची दुचाकीस्वार टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे घटनांवरुन दिसून आले आहे. कात्रज आणि बिबवेवाडी परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाळखी हिसकावून नेली आहे.
भाजी खरेदी करुन रस्त्याने पायी घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील शिवशंभोनगरमधील गल्ली क्रमांक सहामध्ये घडली.
याप्रकरणी सुजाता अशोक गायकवाड (वय 56) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीवर पतीसोबत चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन त्यांच्या गळ्यातील 72 हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली.
ही घटना रविवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास बिबवेवाडीतील जेधेनगरमध्ये घडली. याप्रकरणी सुनंदा विजय मलजी (वय 42) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.





























































