
सामना ऑनलाईन, ब्रेडा
लागोपाठ दोन विजय मिळवित वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची जबरदस्त सुरुवात करणाऱ्या हिंदुस्थानी संघाच्या रडारवर आज जगज्जेता ऑस्ट्रेलियाचा संघ असेल. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० गोलफरकाने फडशा पाडल्यानंतर हिंदुस्थानने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाचाही २-१ गोलने पराभव केला. या दोन विजयांमुळे मनोबल उंचावलेला हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धही आपली विजयी मालिका कायम राखण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल.
सहा देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानी संघ दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. साखळी फेरीत अव्वल स्थानावर असलेले दोन संघ रविवारी जेतेपदाच्या लढतीत भिडणार आहे. युवा दिलप्रीत सिंह, मनदीप सिंह, एस. व्ही. सुनील व ललित उपाध्याय या आघाडीच्या फळीने आतापर्यंत सुरेख खेळ आहे. रमनदीप सिंह पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत जायबंदी झाल्याने तो उर्वरित स्पर्धेस मुकला आहे.




























































