
सामना ऑनलाईन। चंदिगड
पक्के व्यावसायिक म्हणून ओळखल्या जाणाऱया ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानच्या 358 धावा तोडक्या ठराव्यात अशा थाटात फलंदाजी करीत चौथा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात बाजी मारली. पीटर हॅण्डस्कोम्ब (117) व उस्मान ख्वाजा (91) यांनी भक्कम पायाभरणी केल्यानंतर ऍश्टन टर्नरने त्यावर विजयाचा कळस चढवला. टर्नरने 74 धावांची वादळी खेळी केली म्हणून सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने टर्न झाला. तब्बल 17 डावांनंतर केलेली शिखर धवनची (143) शतकी खेळी व्यर्थ ठरली. याचबरोबर या विजयासह कांगारूंनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. आता बुधवार, 13 मार्चला दिल्लीमध्ये पाचव्या लढतीत मालिकेचा फैसला होणार आहे.
रोहित-शिखर जोडीची फटकेबाजी
त्याआधी नाणेफेकीचा कौल जिंकून हिंदुस्थानने फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (95) व शिखर धवन (143) यांनी कर्णधार विराट कोहलीचा निर्णय सार्थ ठरवताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. या दोघांनी जबरदस्त फटकेबाजी करीत 31 षटकांत 193 धावांची दमदार सलामी देत हिंदुस्थानच्या मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. सुरुवातीला संयमाने खेळणाऱया करणाऱया रोहितने नंतर आक्रमक फलंदाजी केली, मात्र 5 धावांनी त्याला शतकाने हुलकावणी दिली. जाय रिचर्डसनच्या गोलंदाजीवर हॅण्डस्कोम्बकरवी झेलबाद होण्यापूर्वी रोहितने 92 चेंडूंत 2 षटकार व 7 चौकारांसह 95 धावांची खेळी केली. शिखर धवनची कारकीर्दीतील सर्वोत्तम एकदिवसीय खेळी पॅट कमिन्सने संपवली. कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होण्यापूर्वी धवनने 143 धावांच्या खेळीत 115 चेंडूंना सामोरे जाताना 3 षटकारांसह 18 चेंडू सीमापार पाठविले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 5, तर जाय रिचर्डसनने 3 फलंदाज बाद केले. ऍडम झम्पाला 1 बळी मिळाला.
ख्वाजा-हॅण्डस्कोम्बने डाव सावरला
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. भुवनेश्वर कुमारने चौथ्याच चेंडूवर ऍरोन फिंचचा शून्यावर त्रिफळा उडवून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. जसप्रीत बुमराहने आलेल्या शॉन मार्शचे (6) दांडके उडवून कांगारूंची 2 बाद 12 अशी दुर्दशा केली, मात्र त्यानंतर उस्मान ख्वाजा व पीटर हॅण्डस्कोम्ब यांनी तिसऱया गडय़ासाठी 192 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव नुसताच सावरला नाही तर आशाही पल्लवित केल्या. 99 चेंडूंत 7 चौकारांसह 91 धावा करणाऱया ख्वाजाला बुमराहने कुलदीपकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला (23) कुलदीप यादवने पायचित करून हिंदुस्थानच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला, मात्र त्याच्या जागेवर आलेल्या ऍश्टन टर्नरने 43 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी करताना 5 सणसणीत चौकारांसह 6 टोलेजंग षटकार ठोकून ऑस्ट्रेलियाला सनसनाटी विजय मिळवून दिला. ऍलेक्स केरीने मोक्याच्या वेळी 15 चेंडूंत नाबाद 21 धावांची खेळी करीत विजयाला हातभार लावला. हिंदुस्थानकडून बुमराहने 2, तर भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
रोहितने धोनीला पिछाडीवर टाकले
‘हिट मॅन’ रोहित शर्माने 95 धावा करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले. रोहितने या खेळीत दोन षटकार ठोकून धोनीचा एकदिवसीय क्रिकेटमधील 217 षटकारांचा विक्रम मोडीत काढत 218 षटकार लगावले. रोहित आता हिंदुस्थानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला आहे.



























































