
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे राज्यातील बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहन धारकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहेत. एकीकडे काही भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल मिळायचे वांदे झालेले असताना दुसरीकडे चंदीगड प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. चंदीगड प्रशासनाने नवीन अबकारी घोरणाला मंजुरी दिली असून आता दारूच्या दुकानांमध्येच नाही तर पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये दारूची विक्री होणार आहे. तसेच मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्सनादेखील विदेशी दारू, वाईन आणि बिअर विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चंदीगड प्रशासनाने आपल्या नवीन अबकारी धोरणात क्रांतिकारी बदल करत दारू विक्रीचे नियम अधिक शिथिल केले आहेत. आता केवळ जुन्या दारूच्या ठेक्यांवरच नाही, तर पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल्स आणि स्थानिक बाजारपेठांमध्येही दारूची दुकाने उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. नवीन धोरणानुसार शहरात एकूण 97 दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दारूच्या दुकानात डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे रोखीच्या व्यवहारांऐवजी पारदर्शकता वाढेल.
नवीन अबकारी धोरणानुसार, बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये ‘अल्कोहल मीटर’ लावणे बंधनकारक असेल जेणेकरून ग्राहक जबाबदारीने मद्यपान करू शकतील. तसेच दारूची वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग लावणे अनिवार्य असेल. यासह सर्व दुकानांवर सीसीटीव्ही आणि लाईव्ह मॉनिटरिंगच्या माध्यमातून प्रशासनाची कडक नजर असेल.
LPG Crisis – देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती
दरम्यान, चंदीगडमध्ये हिंदुस्थानी बनावटीचे मद्य, बीयर आणि वाइन यांच्या किमतीत जास्तीत जास्त 2 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच दारू तयार करणारे बोतलिंग प्लांट्स आता आठवड्यातून 6 दिवस कार्यरत राहू शकतील.
नवीन धोरणामुळे ग्राहकांना सुरक्षित आणि व्यवस्थित वातावरणात दारू उपलब्ध होईल. संघटित किरकोळ विक्री केंद्रांवर विक्रीची परवानगी दिल्याने अवैध दारू विक्रीवर लगाम बसेल आणि महसुलात मोठी वाढ होईल, असे चंदीगड प्रशासनाचे स्पष्ट मत आहे.



























































