मुसेवाला हत्याकांड प्रकरण : पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन मारेकऱ्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन मारेकरी पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना आज पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा झाला. पोलीस आणि मारेकरी यांच्यात तब्बल 5 तास चकमक उडाली. यात तीन पोलीसही जखमी झाले. अटारी सीमेपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर ही चकमक उडाली. आतापर्यंत या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी हल्लेखोरांनी मुसेवाला गावात हत्या केली होती. या हत्याकांडातील दोन आरोपी अटारी सीमेपासून 10 किलोमीटर असलेल्या भाकना गावात शेतात बांधलेल्या घरात लपले होते. मुंबई, दिल्ली, पंजाब पोलिसांचे पथक 52 दिवसांपासून त्यांच्या मागावर होते. हल्लेखोर पाकिस्तानमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, याची माहिती मिळताच पोलिसांनी आज तातडीने कारवाई करत त्यांना चारही बाजूने घेरले. चकमकीत जगरुपसिंह आणि मनप्रितसिंह ऊर्फ मन्नू कुसा या दोघांचा खात्मा झाला. यातील मन्नू कुसा यानेच मुसेवाला याच्यावर पहिली गोळी झाडली होती.

हल्लेखोरांचा पोलिसांवर एके-47 ने गोळीबार

पोलिसांनी आज सकाळी अकराच्या सुमाराला या हल्लेखोरांना घेरले. पहिल्या दोन तासात जोरदार चकमक उडाली. हल्लेखोरांनी पोलिसांवर एके-47 ने गोळीबार केला. मात्र, पंजाब पोलिसांची अँटी-गँगस्टर टास्क फोर्स, स्पेशल ऑपरेशन सेल, ऑर्गनाइज्ड क्राईम कंट्रोल युनिटस बेस्ट शूटर आणि क्विक रिअ‍ॅक्शन टीमने एकत्रितपणे हल्लेखोरांचा खात्मा केला. घटनास्थळावरून एक एके-47, पिस्तूल आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली.