
महाविकास आघाडीच्या काळात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही. मात्र, शिंदे – फडणवीस सरकार येताच मोठय़ा प्रमाणात दंगली घडत आहेत. राज्यात होणाऱया दंगली म्हणजे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. पुढील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यात दंगली घडवायचे काम भाजप करीत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. खासगी दौऱयानिमित्त चंद्रकांत खैरे कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पक्षपाती कारभारावर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतर जनतेत तीव्र नाराजी असतानाही कोश्यारी यांचे स्वागत करण्याचे कारण काय होते, असा सवाल करीत शिवप्रेमींच्या भावना दुखवायचे काम भाजप करीत असल्याचा आरोपही खैरे यांनी केला.





























































