चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा महापूर, पंधरापैकी नऊ तालुक्याला पुराचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्धा, वैनगंगा, उमा, इरई नदीला आलेल्या महापूराचा फटका जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना बसला आहे. अनेक गावांना पुराने वेढा दिला. दोन हजारच्या आसपास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. या पुराचा फटका पाळीव जनावरांनाही बसला आहे.

इरई,अप्पर वर्धा ,गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. वर्धा, वैनगंगा, इरई नदी ओसंडून वाहत आहेत. नदीच्या पुराने अनेक गावांना वेढा दिला. माजरी, बेलसनी गावात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. दोन हजार नागरिकांना सूरक्षितस्थळी प्रशासनाने हलविले. अद्यापी कार्य सुरुच आहे. संततधार पावसामुळे आधीच नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिरणा, मूल तालुक्यातील ताडाव कोराडी आणि वर्धा नदीला पूर आला. त्यामुळे माजरीसह परिसरातील गावांना पुराचा विळखा बसला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या, शेतातील बांधावर अडकून असलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पूरामुळे चंद्रपूर-वणी मार्ग बंद झाला आहे. बामणी येथील वर्धा नदीचा पुलावरून पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजुरा- हैदराबाद मार्ग बंद आहे.तर महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पोडसा पुल पाण्याखाली आला आहे.पुरामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.