चंद्रपुरातला ‘बंद’ कोळसा डेपो अनधिकृतरित्या राजरोस सुरू; प्रशासनाचं दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिषेक भटपल्लीवार

शहरापासून जवळच असलेल्या घुग्गुस मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत कोळसा डेपो चालवले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहरात प्रदूषण वाढत असल्याने कोळसा डेपो शहरापासून सात किलोमीटर दूर हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिल्यानंतर बहुतांश कोळसा व्यापाऱ्यांनी आपले डेपो घुग्गुस मार्गावरील नागाळा, पडोली गावा जवळील रोड लगत हलवले. नियमांची पायमल्ली करीत हे डेपो मागील दहा वर्षांपासून सुरू आहेत. ही गंभीर बाब लक्षात आल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परिसरातील 23 कोळसा डेपोंना क्लोजर नोटीस जारी केल्या. या नोटीस बजावून आज चार वर्षे उलटली, पण डेपो काही बंद झाले नाही. अवैध कोळशाची साठवणूक आणि विक्री याच डेपोमधून होते. पण याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे ना प्रदूषण नियंत्रण विभागाचे. या डेपोंमुळे नागाळा आणि परिसरात प्रदूषण प्रचंड वाढले आहे. एकीकडे डेपोला लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी प्रदूषणामुळे त्रस्त आहेत, तर काळी धूळ उडत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाशी संपर्क साधला असता, कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत, असे उत्तर मिळाले.

तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी प्रदूषण पसरविणाऱ्या 23 कोळसा डेपोंना बंद करण्याचे निर्देश दिले होते. चार वर्षांपूर्वी आगस्ट महिन्यात निर्देश दिले होते. पोलीस प्रशासन आणि तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मदतीने याला टाळे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. सोबतच 18 नोव्हेंबर 2019 ला या कोळसा डेपोंवर न्यायालयीन खटले दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. काही महिन्यासाठी हे डेपो बंद ठेवण्यात आले होते. मात्र, ह्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत पुन्हा हे कोळसा डेपो सुरू करण्यात आले. या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याचं धारिष्ट्य कोण्या राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपाने सुरू आहे का? की प्रशासनातील अधिकारी या मागे आहेत का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.

कोल डेपो सुरू करण्याचे नियम

कोळसा डेपोच्या परिसरात वायू प्रदूषण कमी व्हावे यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. कोळशाचे बारीक कण हवेतून पसरू नये यासाठी पाणी फवारणी केली पाहिजे, या कोळसा डेपोच्या सभोवताल कमीत कमी 3 मीटर उंच सुरक्षा भिंत तयार करावी, कोळशाचा ढीग हा सुरक्षा भिंतीपेक्षा जास्त उंच नसावा, जमिनीखालील पाणीसाठा प्रदूषित होऊ नये यासाठी पक्के रोड आवश्यक, प्रत्येक कोळसा डेपोने परिसरातील वायू प्रदूषणाची माहिती मिळावी यासाठीचे यंत्र बसवावे, टायर व्हाशिंग सिस्टम आवश्यक

या कोलडेपोवर केली होती बंदची कारवाई

1) ओम प्रकाश ट्रेडिंग कंपनी, 2) KGN कोल डेपो, 3) सुरेश अग्रवाल कोल डेपो, 4) आदित्य जैन कोल डेपो, 5) पार्थो डेपो, 6) शहा कोल Pvt Ltd, 7) श्री लक्ष्मी कोल डेपो, 8) युनूस भाई कोल डेपो, 9) महेश शर्मा कोल डेपो, 10) अग्निकुंड इंटरप्राइजेस, 11) समिधा इंटरप्राइजेस, 12) राजेश गोयल डेपो, 13) धर्मपाल अग्रवाल कोल डेपो, 14) ताज कोल डेपो, 15) राजू मालू कोल डेपो, 16) शिव जाजू कोल डेपो, 17) रोहित सहानी कोल डेपो, 18) शिव सरडा कोल डेपो, 19) इंदर बिहानी कोल डेपो, 20) श्यामजी काब्रा कोल डेपो, 21) मनीष अग्रवाल कोल डेपो, 22) महालक्ष्मी ट्रेडर्स, 23) भाग्यश्री ऍग्रो, अशी आहेत कारवाई केलेल्या कोल डेपोच्या नावे.